Us Isreal Iran War – युद्धामुळे देशात खाद्यतेलाच्या किंमती भडकल्या, प्रति लिटर 5 रुपयांनी महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशात सुरू असलेल्या तणावामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. इराण आणि इस्त्रायलमधील संघर्षामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति लिटर 3 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक तेल पुरवठा खंडीत होणे आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे किंमतीवर दबाव येत आहे. यामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किंमती आणखी वाढू शकतात.

गेल्या काही दिवसांत सूर्यफूल, सोयाबीन, पाम आणि मिश्रित तेलाच्या किमती प्रति लिटर सुमारे 3 ते 5 रुपयांनी वाढल्या आहेत. ही वाढ अंदाजे 5 टक्के आहे. जागतिक तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आणि मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत आहे.

हिंदुस्थानात खाद्यतेलाचा वापर खूप जास्त आहे, परंतु मागणीच्या तुलनेत देशांतर्गत उत्पादन कमी आहे. जागतिक स्तरावरील तणावाची परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर येत्या काही दिवसांत सूर्यफूल आणि मिश्रित तेलाच्या किमती प्रति लिटर आणखी 10 ते 15 रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि रुपया कमकुवत झाल्यामुळे खाद्यतेलांची आयात देखील महागली आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर धोका वाढल्याने मालवाहतुकीचे शुल्क वाढले आहे. याचा परिणाम विशेषतः सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किमतींवर होत आहे, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थान युक्रेन, रशिया, अर्जेंटिना आणि बल्गेरिया सारख्या देशांमधून सूर्यफूल तेलासह अनेक खाद्यतेल आयात करतो. सध्याच्या जागतिक तणावामुळे, या देशांमधून पुरवठ्यावर परिणाम होत आहे, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील किमतींवर दबाव वाढत आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही नीलम ट्रेडर्सचे सचिन रांका यांनी सांगितले की, घाऊक किमती 13 किलोमागे 50 ते 60 रुपयांनी वाढल्या आहेत. बहुतेक दुकानदार अजून जुना साठा विकत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत किरकोळ किमती वाढतील, असेही रांका यांनी नमूद केले.