
हिंदुस्थानातील इराणचे राजदूत अब्दुल मजीद हकीम इलाही यांनी अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे की, इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेसमोर झुकणार नाही. इराण पुढील दोन वर्षे युद्ध लढण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या एका आठवड्यात इराण आपल्या नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
इलाही यांनी म्हटले की, सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची एक ठराविक प्रक्रिया असून त्याचे काटेकोर पालन केले जाईल. अमेरिका आणि इस्रायलने खामेनी यांची हत्या केल्यामुळे इराणची जनता अधिक संघटित झाली आहे. इराणने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला होता, मात्र आता आमच्यावर अन्यायकारक हल्ले झाल्यामुळे आम्हाला संरक्षणात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. आम्ही आमच्या जमिनीसाठी, सन्मानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी कोणत्याही बलिदानास तयार आहोत, असेही ते म्हणाले.
प्रादेशिक तणावावर भाष्य करताना इलाही म्हणाले की, या संकटामुळे इराणच्या शेजारील देशांना आता हे कळून चुकले आहे की, बाह्य शक्ती त्यांना सुरक्षेची खात्री देऊ शकत नाहीत. प्रादेशिक समस्या या स्थानिक पातळीवरच सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी कोणत्याही परकीय शक्तीची गरज नाही. इराण आपल्या शेजाऱ्यांवर तेव्हाच हल्ला करेल जेव्हा आमच्यावर हल्ला होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




























































