रसगुल्ला घशात अडकल्याने 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, लग्नाकार्यात दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमशेदपूर येथील बेलाजुडी पंचायत अंतर्गत येणाऱ्या मलियंता गावात शुक्रवारी रात्री एका लग्नसोहळ्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. लग्नाच्या पंगतीत जेवण करत असताना रसगुल्ला घशात अडकल्याने 41 वर्षीय ललित सिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ललित सिंह रात्री उशिरा एका विवाह समारंभासाठी गेले होते, जिथे जेवताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास ललित सिंह यांनी रसगुल्ला खाल्ला असता तो अचानक त्यांच्या श्वसननलिकेत अडकला. यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांची प्रकृती वेगाने बिघडली. उपस्थितांनी प्रयत्न करूनही रसगुल्ला बाहेर काढता आला नाही. त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्वसनमार्ग बंद झाल्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने हा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.