
नेपाळमध्ये हिंदुस्थानी भाविकांना नेणारी एक मिनी बस दरीत कोसळली. त्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी आहेत. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सर्व भाविक मनकामना मंदिरात दर्शन घेऊन तनहुन जिह्यातील अंबुखैरेनी येथे इलेक्ट्रिक मिनी बसने जात होते. बसमध्ये चालक आणि वाहकासह 15 पेक्षा जास्त जण होते. वाटेत घाट उतरताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस 200 फूट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच, काही स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले.
मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश
मृतांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. मधु कुमार, अनामलिक, मीनाक्षी, शिवगामी, विजयल, मीना आणि तमिलरसी अशी मृतांची नावे असून सर्वांचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त आहे. बसचा चालक बचावला असून वाहक जखमी झाला आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येत आहे.




























































