
मराठी नववर्षाचा पहिला सण असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईकरांनी ‘बंपर’ खरेदी केली. सराफा बाजारापासून ते वाहनांच्या शोरूममध्ये खरेदीसाठी सकाळपासूनच ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. इस्रायल-इराणच्या युद्धाचा परिणाम होऊन सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ग्राहकांनी या संधीचे ‘सोने’ केले. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात सराफा बाजारात तब्बल 200 कोटींची उलाढाल झाली.
संपूर्ण राज्यभरात गुढीपाडवा सण मोठय़ा उत्साहात साजरा झाला. मुंबईत खरेदीचा प्रचंड उत्साह होता. दादर, लालबाग, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर, विलेपार्ले, मुलुंड आदी परिसरांतील ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. इस्रायल-इराक युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुढीपाडवा सणादरम्यान सोन्याच्या दरात झालेली घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे दिवसभर सोने खरेदीमध्ये उत्साह दिसला. बुधवारी सोन्याचा भाव प्रतितोळा 1 लाख 60 हजार रुपये होता. गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी त्यात आणखी घसरण झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 1 लाख 40 हजारांपर्यंत खाली आला. सोने स्वस्त झाल्याची संधी ग्राहकांनी साधली. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात शुभमुहूर्तावर 80 ते 90 टन सोन्याची विक्री झाल्याची माहिती इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे कुमार जैन यांनी दिली. मध्यपूर्वेकडील संघर्षामुळे पुढील काही दिवसांत सोन्याचा भाव आणखी खाली येईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
कार खरेदीलाही तुफान प्रतिसाद
मुंबईकरांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी खरेदीला पसंती दिली. शहरातील चारही आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन नोंदणीला तुफान प्रतिसाद लाभला. ताडदेव आरटीओमध्ये 140, वडाळा आरटीओ- 194, बोरीवली आरटीओ – 644, अंधेरी आरटीओमध्ये 77 वाहनांची नोंदणी झाली. यात कार, दुचाकींच्या नोंदणीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आरटीओच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.






























































