
हिंदुस्थानात निर्माण झालेल्या एलपीजी तुटवड्याबाबत इराणने चिंता व्यक्त केली असून संघर्षजन्य परिस्थितीतही गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्याचे मुंबईतील इराणचे महावाणिज्यदूत सईद रझा मोसायब मोटलाघ यांनी सांगितले. हिंदुस्थान हा आमचा मित्र आणि सहकारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
IANS शी बोलताना सईद रझा मोसायब मोटलाघ म्हणाले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने सुरुवातीपासूनच हिंदुस्थानला मित्र आणि भागीदार मानले आहे. मुंबईतील महावाणिज्यदूत म्हणून जेव्हा मी लोकांना गॅसच्या तुटवड्याचा सामना करताना पाहिले, तेव्हा मला वैयक्तिकरित्या खूप चिंता वाटली, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सध्याची परिस्थिती प्रत्यक्षात युद्धासारखी आहे आणि गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांनाही मोठा धोका असतो. अगदी छोटासा हल्लाही गंभीर परिणाम घडवू शकतो. तरीही देवाच्या कृपेने इराणने या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला, ज्यामुळे ती सुरक्षितपणे प्रवास करू शकली. यामुळे आमची हिंदुस्थानसोबतची मैत्री स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
Mumbai, Maharashtra: Consulate General of Iran, Saeid Reza Mosayeb Motlagh says, “The Islamic Republic of Iran has, from the very beginning, shown that it is a friend and partner of India. Personally, as the Consul General of the Islamic Republic of Iran in Mumbai, when I saw… pic.twitter.com/UNxfxVwiXX
— IANS (@ians_india) March 20, 2026
दरम्यान, हिंदुस्थानचा ध्वज असलेले ‘जॅग लाडकी’ हे क्रूड ऑईल टँकर सुमारे 80,886 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन गुजरातमध्ये दाखल झाले आहे. त्याआधी ‘शिवालिक’ हे एलपीजी टँकर युद्धग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून गुजरातमधील मुंद्रा बंदरात पोहोचले. या जहाजामध्ये कतारमधून सुमारे 40,000 मेट्रिक टन स्वयंपाकाचा गॅस आणण्यात आला होता. आखाती संघर्षामुळे देशात निर्माण झालेल्या एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ही पुरवठा जहाजे अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडे पर्शियन आखातात सध्या हिंदुस्थानचे एकूण 22 जहाजे कार्यरत आहेत. हिंदुस्थान हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्चे तेल आयात करणारा देश असून आपल्या एकूण गरजांपैकी सुमारे 88 टक्के तेल आयात करतो. देशात दररोज सुमारे 5.8 दशलक्ष बॅरल तेलाचा वापर होतो, त्यापैकी 2.5 ते 2.7 दशलक्ष बॅरल तेल सऊदी अरेबिया, इराक आणि यूएईसारख्या आखाती देशांकडून होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे आयात केले जाते.
याच मार्गातून हिंदुस्थानच्या एकूण एलपीजी गरजेपैकी 55 टक्के आणि एलएनजी (तरलीकृत नैसर्गिक वायू) पुरवठ्यापैकी 30 टक्के पुरवठा होतो. हा गॅस वीज निर्मिती, खत उद्योग, सीएनजी आणि घरगुती वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.





























































