
आखाती देशांमधील तणाव वाढत असतानाच इराणने बुधवारी पश्चिम इराकच्या अनबार प्रांतात मोठा हवाई हल्ला केला. या भीषण हल्ल्यात इराकचे ७ सैनिक जागीच ठार झाले असून, अन्य १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. इराणने अनबार प्रांतातील एका लष्करी वैद्यकीय केंद्र आणि जवळच असलेल्या इंजिनिअरिंग युनिटला लक्ष्य केले. हे ठिकाण इराकच्या पॉपुलर मोबिलायझेशन फोर्सेसशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
इराकच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांनुसार वैद्यकीय सुविधा किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे. इराणने केलेला हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे उघड उल्लंघन असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
हल्ल्यानंतर अनबार प्रांतात बचाव कार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. इराकने या घटनेला धोकादायक चिथावणी, असे संबोधले असून, कायदेशीर चौकटीत राहून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आमच्याकडे सुरक्षित असल्याचे इराकच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.



























































