
देशाचे संरक्षण करताना सर्वोच्च वीरता पदक मिळवणाऱ्या जवानांना आता देशभरात रेल्वेने कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, यापुढे हिंदुस्थानातील लष्कर, नौदल आणि वायू दलातील अशा तिन्ही दलातील ज्या जवानाला वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हिंदुस्थानात कोणत्याही ठिकाणी रेल्वेचा आजीवन मोफत प्रवास करता येईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वीरता पदक विजेत्यांना रेल्वे प्रवास आता मोफत असणार आहे.
केंद्र सरकारच्या या नव्या योजने अंतर्गत पदक विजेता पुरुष किंवा महिला असेल तर दोघांनाही हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे केवळ पदक विजेताच नव्हे तर त्यांची पत्नी किंवा पती हेसुद्धा या योजनेसाठी पात्र असतील. जर पदक विजेता जवान अविवाहित असेल आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झाला असेल तर त्या जवानाच्या आई-वडिलांना ही सुविधा दिली जाईल. या योजने अंतर्गत लाभार्थी आपल्या सोबत एक सहायकसुद्धा घेऊन जाऊ शकेल. म्हणजेच रेल्वेने प्रवास करताना पदक विजेत्यासोबत आणखी एकाला रेल्वेने मोफत प्रवास करता येईल. ही सुविधा रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेपंड क्लास आणि एसी चेअर कारसाठी मान्य असणार आहे. पदक विजेत्यांच्या सन्मानासाठी सरकारने सेवानिवृत्त सैनिक आणि ‘अग्निवीर’च्या पुनर्वसनासाठी सुद्धा ठोस पावले उचलली आहेत.
रेल्वेने भरती प्रक्रियेत माजी सैनिकांसाठी आरक्षण जाहीर केले आहे. यानुसार, लेवल 1 ग्रुप डी पदांमध्ये 20 टक्के आरक्षण, लेवल-2 आणि त्यावरील पदांमध्ये 10 टक्के आरक्षण, अग्निवीरांसाठी लेवल-1 मध्ये 10 टक्के आणि लेवल-2 मध्ये 5 टक्के आरक्षण ठेवले आहे. या रिपोर्टनुसार, 2024 आणि 2025 च्या भरतीत माजी सैनिकांसाठी एकूण 14,768 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.
























































