Iran America War – अमेरिकेचा आक्रमक पवित्रा, जमिनीवरील हल्ल्यासाठी 3 हजार 500 सैनिक युद्धक्षेत्रात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आता एक मोठा खुलासा युद्धाच्या बाबतीत समोर आलेला आहे. वॉशिंग्टन पोस्टने केलेल्या दाव्यानुसार, हजारो अमेरिकन सैनिक मध्य-पूर्वेत दाखल होत आहेत. यामुळे युद्ध आता एका नवीन धोकादायक वळणावर पोहोचल्याचे दिसून येत आहे. रिपोर्टनुसार पेंटागॉन (अमेरिकेचा संरक्षण विभाग) इराणवर जमिनीवरील हल्ल्याची तयारी करत आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत वॉशिंग्टनच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोणतीही संभाव्य जमिनीवरील कारवाई पूर्ण-प्रमाणातील हल्ला नसेल. त्याऐवजी, यात विशेष कृती दल आणि पायदळ सैनिकांचा समावेश असेल. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अशा मोहिमेत अमेरिकी सैन्याला इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे, हातघाईची लढाई आणि आयईडी हल्ल्यांसह विविध धोक्यांचा सामना करावा लागू शकतो. अहवालात असेही म्हटले आहे की, ट्रम्प सतत दुटप्पी भूमिका घेत आहेत. कधी युद्ध संपले असे जाहीर करतात. तर कधी आक्रमक पवित्रा घेतात. त्यामुळे अमेरिकेतील जनता देखील आता संभ्रमात पडली आहे.

दरम्यान, यूएस सेंट्रल कमांडने (CENTCOM) घोषणा केली आहे की सुमारे ३,५०० मरीन सैनिकांचे एक टास्क फोर्स मध्य पूर्वेत दाखल झाले आहे. CENTCOM ने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, अमेरिकन खलाशी आणि मरीन सैनिक २७ मार्च रोजी USS त्रिपोली (LHA 7) या जहाजातून यूएस सेंट्रल कमांडच्या क्षेत्रात दाखल झाले आहे.

तज्ञांच्या मते, पेंटागॉनने यापूर्वी ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या पॅराट्रूपर्सना मध्य-पूर्वेत तैनात करण्याचे आदेश दिले होते. यामुळे युद्ध आता अधिक चिघळणार हे स्पष्ट होत आहे. विश्लेषकांच्या मते, ट्रम्प प्रशासनाला इराणच्या तेल सुविधा आणि क्षेपणास्त्र क्षमतांना लक्ष्य करून प्रादेशिक सुरक्षा आणि जागतिक ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करायचा आहे. तथापि, जमिनीवरील कारवाईमुळे अमेरिकन सैन्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच हे युद्ध आता अधिक लांबण्याची भीती निर्माण झाली आहे.