
इराण–अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका अनेकांना बसला आहे. आता या युद्धामुळे हिंदुस्थानातील बहुप्रतीक्षित तेजस लढाऊ विमानांच्या इंजिनचा पुरवठा रखडला आहे. सध्या या इंजिनचा पुरवठा करणे शक्य होणार नाही, असे या विमानांना इंजिन पुरवणारी अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) ने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला सांगितले आहे.
एचएएलमध्ये तयार असलेले 9 तेजस एमके 1ए विमाने इंजिनच्या अभावी वायुसेनेला मिळू शकलेली नाहीत, तर 5 विमाने पूर्णपणे तयार आहेत. 19 विमानांचे एअर फ्रेमदेखील तयार आहेत. जर पुरवठा पूर्ववत झाला तर या वर्षी 24 आणि पुढील वर्षापर्यंत 30 इंजिने मिळतील. 9 हजार कोटी रुपयांच्या 113 इंजिनांच्या करारावर पंपनी पुढे जाऊ शकेल. वर्षाच्या अखेरपर्यंतच इंजिन मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. 113 इंजिनांच्या पुरवठय़ाचा करार झाला होता. एचएएलने मार्च 2026 पर्यंत 24 तेजस विमाने वायुसेनेला देण्याचे वचन दिले होते, परंतु ते अद्याप पूर्ण झाले नाहीत. याआधी फेब्रुवारी 2021 मध्ये सरकारने एचएएलसोबत 83 तेजस मार्क-1ए खरेदी करण्यासाठी 48 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. अमेरिकन इंजिनाच्या वितरणातील विलंबामुळे एचएएलने अद्याप एकही विमान सुपूर्द केले नाही. 2028 पर्यंत एचएएल सर्व विमाने वायुदलाला सुपूर्द करेल अशी अपेक्षा आहे. यासाठी एचएएलला जीईकडून आतापर्यंत चार इंजिन मिळाले आहेत.
तेजसची खास वैशिष्टय़े
तेजस मार्क1ए हे सिंगल इंजिन असलेल्या तेजस विमानाची अत्याधुनिक आवृत्ती आहे. हे विमान चौथ्या पिढीचे हलके लढाऊ विमान आहे. यात अपग्रेडेड एव्हियोनिक्स आणि रडार सिस्टीम बसवलेली आहे. हे विमान मिग-21 या विमानाची जागा घेणार आहे.


























































