
राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि बनावट फार्मर प्रोडय़ूसर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी करून नाफेड घोटाळ्यातून भोंदू अशोक खरात याने कोटय़वधींचा काळा पैसा जमा केला. विश्वासू व आपल्याकडे येणाऱया सुमारे दीडशे जणांच्या नावे बँका, पतसंस्थांमध्ये ‘डमी’ खाते उघडून काळा पैसा पांढरा केला. शेकडो कोटींची हेराफेरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
बनावट फार्मर प्रोडय़ूसर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी करून नाफेड व एनसीसीएफकडून कोटय़वधी रुपये लाटले गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात पाच हजार कोटींचा नाफेड कांदा घोटाळा झाला आहे, यातही खरातचा सहभाग दिसून येत आहे. व्यंकटेश आणि ईशान्येश्वरसह सुमारे वीस बनावट कंपन्यांमार्फत त्याने शंभर कोटींची आर्थिक उलाढाल केली आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्वतंत्र भारत पक्षाचे पदाधिकारी नीलेश शेडगे यांनी अहिल्यानगर जिह्यातील श्रीरामपूर पोलिसांना दिले आहे. तेथील पोलीस उपअधीक्षकांनी ही तक्रार नाशिक येथे एसआयटीकडे पाठविली आहे.
सर्व खात्यांचा नॉमिनी खरातच
राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, उद्योगपती, व्यावसायिक, भोंदूगिरी आणि बनावट कंपन्या यातून खरात याने शेकडो कोटींचा काळा पैसा जमा केला, तो पांढरा करण्यासाठी काही बँका, पतसंस्थांमध्ये त्याने वेगवेगळ्या नावाने दीडशेहून अधिक खाती उघडली होती. यात घनिष्ठ संबंध असलेल्या राजकीय नेते, अधिकाऱयांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. या सर्व खात्यांचा नॉमिनी खरातच आहे. एसआयटी पथक आता या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे. यामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस
शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणी खरातची पत्नी कल्पना हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे, ती फरार असून, शोध सुरू आहे. ती परदेशात पळून जावू नये, यासाठी तिच्याविरुद्ध शिर्डी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली.

























































