
दिल्ली स्पेशल सेल व केंद्रीय तपास यंत्रणेला मदत पुरवत महाराष्ट्र एटीएसने दोघांना पकडून देण्याचे काम केले. त्यात एक विद्यार्थी आणि ऑटो इलेक्ट्रिक इंजिनीयरचा समावेश आहे. शिवाय एका बड्या फायनान्स ग्रुप चालविणाऱ्याला नोटीस देऊन त्याला दिल्ली स्पेशल सेलकडे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने त्या दोन्ही तपास यंत्रणांनी 3 एप्रिलच्या पहाटे कुर्ला व ठाणे येथे छापे टाकले होते. या कारवाईत कुर्ला येथून मोहम्मद हम्माद अलाउद्दीन मेहमूद अली सिद्दिकी (18) याला, तर ठाण्यातून मोसीब अहमद इफ्तिकार अहमद ऊर्फ कमाल ऊर्फ सोनू (33) अशा दोघांना पकडले. सिद्दिकी हा विद्यार्थी तर सोनू हा ऑटो इलेक्ट्रिक इंजिनीयर आहे. याशिवाय ठाण्यात राहणारा यासीर मुस्लीम खान (27) या बड्या फायनान्स ग्रुपशी संबंधित असलेल्या तरुणाच्या घराची झडती घेण्यात आली. शिवाय चौकशीकरिता दिल्ली स्पेशल सेलच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.



























































