
बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका शिक्षकाने इयत्ता तिसरीत शिकणार्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला असून संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव आत्माराम मानतोडे (५७, रा. चनखोरे कॉलनी, मेहकर) हा लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मागील काही दिवसांपासून तो तिसरीतील काही विद्यार्थिनींना लक्ष्य करत होता. ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजण्यापूर्वी तसेच ८ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने तीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलींनी अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संताप उसळला. आज ८ एप्रिल रोजी सकाळी संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळा गाठून आरोपी शिक्षकाला पकडले. यावेळी संतप्त जमावाने त्याची धुलाई केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने गावात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी अमरनाथ नागरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाची समजूत काढून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले. तणावाची परिस्थिती लक्षात घेता गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, ७८, ३५२ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वसंत पवार करीत आहेत. विशेष म्हणजे संबंधित शिक्षक येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होता.
दरम्यान शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी शरद काळे व केंद्रप्रमुख रा. ना. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित शिक्षकावर निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गावकरी करीत आहे.


























































