व्यावसायिकाची हत्या करून फरार झालेल्या गुंडाला दुबईत अटक, लवकरच हिंदुस्थानात प्रत्यार्पण करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणातील व्यावसायिकाची हत्या करून दुबईत पळून गेलेल्या हिंदुस्थानातील कुख्यात गुंडाला दुबईत अटक करण्यात आली आहे. राव इंद्रजीत यादव असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. यादव याचे इन्स्टाग्रामवर 15 लाख फॉलोअर्स असून तो दुबईत आलिशान जीवनशैली जगत होता. दुबईतील अधिकाऱ्यांनी यादवशी संबंधित कागदपत्रे मागितली असून, लवकरच त्या हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यादव याच्याविरोधात हरियाणा आणि उत्तर प्रदेशात खंडणी उकळणे, बेकायदेशीर कर्जवसुली, शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे, बेकायदेशीर कमिशन मिळवणे आदी 15 हून अधिक गुन्हे आणि दोषारोपपत्रे दाखल आहेत. गेल्या वर्षी एका व्यावसायिकाच्या हत्येनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता.

तपास यंत्रणेने दिल्ली आणि हरियाणातील गुरुग्राम येथे टाकलेल्या छाप्यांदरम्यान, यादव आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित पाच आलिशान गाड्या, बँक लॉकर, 17 लाख रुपयांची रोकड, विविध कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि डिजिटल डेटा जप्त केला होता.

राव इंद्रजीत यादव हा जेम रेकॉर्ड्स एन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या म्युझिक कंपनीचा मालक आहे. 2006 मध्ये या कंपनीची स्थापन करण्यात आली असून ही कंपनी हरियाणवी, पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रादेशिक गाण्यांची निर्मिती आणि वितरण करते. यादव हा सोशल मीडियावर तो खूप लोकप्रिय असून इन्स्टाग्रामवर त्याचे 15 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.