
विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये माणगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २८ एप्रिल रोजी रिक्त पोट जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होईल.
राज्यातील ग्रामपंचायतींतील सदस्य, थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा किंवा अन्य कारणामुळे पोट निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार जाहीर झाला आहे. माणगाव तालुक्यातील पळसप व टोळखुर्द ग्रामपंचायतीत थेट सरपंचपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. तर अंबर्ले, काकल, पहेल, हरकोल, विहुले, कुमशेत, शिरवलीतर्फे निजामपूर, देगाव, वडवली, वणीमलईकोंड, गांगवली, नांदवी, गोवेले या ग्रामपंचायतींत रिक्त असलेल्या प्रत्येकी एका जागेसाठी तर दहिवलीतर्फे गोवेले ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
१३ एप्रिल हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १५ एप्रिल रोजी छाननी आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस १७ एप्रिल आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटप करून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.























































