
घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील साई नगर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत रेखा जयंतराव दातारकर यांच्या पायाला किरकोळ इजा झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
रेखा दातारकर या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलेंडरने पेट घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घरात घबराट निर्माण झाली. त्यांनी तात्काळ आरडाओरड केल्याने शेजारील नागरिक धावून आले. प्रसंगावधान राखत शेजाऱ्यांनी जळत असलेला सिलेंडर घराबाहेर काढला व सुरक्षित ठिकाणी नेऊन रेतीच्या ढिगाऱ्यावर टाकला. यानंतर सिलेंडरमधील गॅस बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यात यश आले. या घटनेत रेखा दातारकर यांच्या पायाला किरकोळ भाजल्या गेल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, संबंधित सिलेंडर हा गॅस एजन्सी वरोरा मधून दोन दिवसांपूर्वीच आणला असल्याची माहिती रेखा दातारकर यांनी दिली. या घटनेनंतर सिलेंडरच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित यंत्रणेकडून चौकशीची मागणी होत आहे.





























































