
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए)वांद्रे कुर्ला संकुलातील शरद पवार अॅकॅडमीच्या मैदानावर आगामी टी-20 मुंबई लीगची रंगीत तालीम असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चे दमदार उद्घाटन केले. 20 ते 30 एप्रिलदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत आठ संघांमध्ये चार मैदानांवर (वांद्रे-कुर्ला संकुल, कांदिवली, ठाणे, महालक्ष्मी) जोरदार चुरस रंगणार आहेत.
एमसीएच्या निवड समितीने तयार केलेल्या या स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे, तर फ्रँचायझींना फॉर्म, फिटनेस आणि कॉम्बिनेशनची अचूक चाचणी करता येणार आहे. एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ही स्पर्धा मुंबई क्रिकेटच्या दर्जेदार भविष्यासाठी महत्त्वाची पायरी असल्याचे स्पष्ट केले. एकंदरीत, हीच स्पर्धा टी-20 मुंबई लीगच्या महा रनसंग्रामाची खरी रंगीत तालीम असल्यामुळे यात तुफानी फटकेबाजी पाहायला मिळणार. या स्पर्धेचे उद्घाटन माजी कसोटीपटू राजू कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी एमसीए अध्यक्ष नाईक यांच्या समवेत सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, संयुक्त सचिव नीलेश भोसले, कोषाध्यक्ष अरमान मलिक, अॅपेक्स कमिटीचे मिलिंद नार्वेकर, नदीम मेमन, भूषण पाटील आणि हिंदुस्थानी महिला संघाच्यामाजी कर्णधार डायना एडुल्जी उपस्थित होत्या.




























































