मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी लोकलची ‘लटपंती’, मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या संयमाची परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेनच्या विलंबाचा मनस्ताप कायम राहिला आहे. लोकल ट्रेन वेळेवर चालवण्याची मागणी प्रवासी वारंवार करीत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाकडून आता मेल-एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देऊन लोकल ट्रेनची रखडपट्टी केली जात आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून प्रशासनाने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन तब्बल 15 ते 40 मिनिटांपर्यंत उशिराने धावत आहेत. कोलमडलेल्या वक्तशीरपणाला दिव्यातील फाटकाचे कारण देत रेल्वे प्रशासन हात वर करीत आहे. वास्तवात या प्रश्नावर वेळीच ठोस तोडगा काढण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यात आता मेल-एक्प्रेस गाड्यांना मोकळी वाट करून देण्यासाठी लोकल गाड्यांना मागे ठेवले जात आहे. ऐन ‘पीक अवर्स’ला लोकल ट्रेन तब्बल 40 मिनिटांपर्यंत उशिराने धावत आहेत. याचा लाखो नियमित प्रवाशांना फटका बसत आहे. दिव्यातील उड्डाणपुलाला 2013 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. तेव्हापासून ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

दानापूर, राजधानी एक्सप्रेसला प्राधान्य

सकाळी कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी नोकरदारांना घाई करावी लागते. याच वेळेत मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाचा बोजवारा उडत आहे. सकाळी 9.42 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी डाऊन लोकल ठाण्यात कधीच वेळेवर पोहोचत नाही. या गाडीच्या वेळेत प्रगती एक्सप्रेस, दानापूर एक्प्रेस, राजधानी एक्प्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिले जाते. यात लोकलचे वेळापत्रक बिघडत असल्याचे प्रवासी सांगतात.

प्रशासनाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरूच!

लोकलच्या गर्दीचे बळी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने स्वयंचलित दरवाजाची नॉन-एसी लोकल मुंबईत आणली आहे. ती गाडी प्रत्यक्ष प्रवासी सेवेत कधी धावणार हा प्रश्न आहे. गर्दी नियंत्रणासाठी हे मोठे पाऊल उचलल्याचा दिखावा करणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाचा दररोज प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरूच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कल्याण येथील दिनेश वाघमारे यांनी दिली. विस्कळीत वेळापत्रकाला नियोजनाचा अभाव कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले.