
शिवसेनेचे सर्व खासदार एकजूट आहेत आणि निष्ठेने पक्षाच्या पाठीशी ठाम उभे आहेत. ऑपरेशन टायगर फुस्स झाले असून आता आम्ही ऑपरेशन लांडगा करू. आमचे वाघ मोकळ्या जंगलात फिरत आहेत. संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे गट किंवा भाजपचे लोक हा उपद्व्याप करत असतात, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षाच्या बैठकीत काय चालले याच्यावर उगाच अफवा पसरवणे, चुकीच्या बातम्या देणे योग्य नाही. काल शिवसेना खासदारांची बैठक नेहमीप्रमाणे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार केली. अशा बैठका नेहमी होत असतात. त्या बैठकीला मुंबईतील तीनही खासदार उपस्थित होते. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना-पाटील यांच्यासह नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित पाच खासदारांशी आधीच चर्चा झाली होती आणि त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेतल्या होत्या.
यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्याकडे मुलीच्या लग्नाचे कार्य सुरू होते.ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. तिथून ओमराजे यांनी बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत. शिर्डीच्या दवाखान्यातून ते बैठकीत सहभागी झाले. नागेश आष्टीकर यांचे पुत्र हिंगोली-परभणीतून विधान परिषद निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्यांनी तिथूनच सहभाग घेतला. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरात मंगलकार्य आहे. मुलीच्या लग्नासंदर्भात बैठक आहे. त्यांनीही घरूनच उपस्थिती लावली, असेही राऊत यांनी सांगितले.
सगळ्यांशी आधीच चर्चा झाली होती आणि त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित राहू सांगितले होते. जगभरात आता हीच पद्धत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अशा प्रकारे व्हर्च्युअली उपस्थित राहतात. संजय बंडू जाधव यांच्याशाही उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून पुढल्या दोन दिवसात ते भेटीसाठी येत आहेत. आमचा आमच्या खासदारांना पूर्ण विश्वास आहे आणि यापुढेही राहील, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा हिरक महोत्सव
19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद सभागृहामध्ये साजरा होईल. शिवसेनेला 60 वर्षे पूर्ण होत असून यंदा हिरक महोत्सव आहे. त्या निमित्ताने काही कार्यक्रम ठेवले आहेत. त्यातला एक कार्यक्रम फार सुटसुटीत आहे. तो आता सांगत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.




























































