
हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत FIH Hockey Women’s Nations Cup 2025-26′ च्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. ऑकलंड येथे रविवारी (21 जून 2026) झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने यजमान न्यूझीलंडचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. हिंदुस्थानी महिला संघाचे हे नेशन्स कपमधील दुसरे जेतेपद असून संघाने पुढील हंगामातील ‘एफआयएच हॉकी प्रो लीग’चे तिकीटही पक्के केले आहे.
हिंदुस्थानच्या संघाने सामन्याच्या सुरुवातीपासून सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. चौथ्या मिनिटाला नवनीत कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत हिंदुस्थानला स्वप्नवत सुरुवात करून दिली. त्यानंतर १५ व्या मिनिटाला सुनेलिता टोप्पो हिने दीपिकाच्या पासवर सुरेख गोल करत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. या दडपणातून न्यूझीलंडचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. हिंदुस्थानने केवळ आक्रमणातच नव्हे, तर संरक्षणातही अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट कामगिरी केली. चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र हिंदुस्थानची अनुभवी गोलरक्षक सविताने अप्रतिम बचाव करत यजमानांचे मनसुबे उधळून लावले. संपूर्ण सामन्यात लालरेमसियामीने केलेल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी तिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर हिंदुस्थानची दीपिका 6 गोल्ससह अमेरिकेच्या ॲशली सेसासोबत स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली.
!
The Indian Women’s Hockey Team reigns supreme at the FIH Hockey Women’s Nations Cup New Zealand 2025–26!
A campaign defined by resilience, belief and brilliant teamwork ends with the trophy in Indian hands. #HockeyIndia #IndiaKaGame… pic.twitter.com/Zp6O29Xm2o
— Hockey India (@TheHockeyIndia) June 21, 2026
या विजयामुळे हिंदुस्थानच्या महिला संघाने पुढील हंगामातील ‘एफआयएच हॉकी प्रो लीग’चे तिकीटही पक्के केले आहे. भारताचे हे नेशन्स कपमधील दुसरे जेतेपद असून, यापूर्वी 2022 मधील पहिल्या आवृत्तीतही हिंदुस्थानने बाजी मारली होती. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ अजिंक्य राहिला, त्यांनी साखळी सामन्यात अमेरिका, जपान आणि उरुग्वेचा पराभव केला, तर उपांत्य फेरीत चिलीचा 6-0 असा धुव्वा उडवला होता. या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ‘हॉकी इंडिया’ने संघातील प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.























































