किट खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, आईने दागीने विकले, खेळण्यावर टीका व्हायची; विश्वचषक विजेत्या क्रांती गौडची संघर्षगाथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

FIFA World Cup 2026 सह सध्या जगात ICC Women’s T20 World Cup 2026 चा धुरळा सुरू आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला नमवच स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. सध्या संघ गुणतालिकेत 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. या संघात आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2025 विजेत्या हिंदुस्थानी संघाची वेगवान गोलंदाज क्रांती गौडचा सुद्धा समावेश आहे. स्पर्धे दरम्यान तिने एका मुलाखतीमध्ये आपल्या संघर्षमय जीवनाबद्दल भाष्य केलं आहे.

मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून आलेल्या क्रांतीने ‘जिओस्टार’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सुरुवातीच्या दिवसांतील संघर्षाला उजाळा दिला. ज्या ग्रामीण भागात मुलींवर अनेक बंधने असायची आणि त्यांच्या क्रिकेट खेळण्यावर टीका केली जायची, अशा परिस्थितून पुढे येत तिने आपले टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न चिकाटीने पूर्ण केले. या खडतर प्रवासात आर्थिक टंचाई हा क्रांतीसमोरील सर्वात मोठा अडथळा होता, मात्र तिच्या पालकांनी तिच्यावर नेहमीच विश्वास दाखवला. क्रांतीने भावूक होत सांगितले की, सरावासाठी आवश्यक असलेले क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी तिच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते, तेव्हा तिच्या आईने स्वतःचे दागिने विकून तिला खेळण्याचे साहित्य आणून दिले होते. कुटुंबाने केलेल्या या मोठ्या बलिदानामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आणि त्यांच्या या त्यागाचे चीज करण्यासाठी आपण मैदानावर जीवाचे रान केले, असे क्रांतीने नमूद केले.

लय भारी! फिफाच्या अधिकृत पेजवर मराठीत पोस्ट; जागतिक व्यासपीठावर मायबोलीचा गौरव

क्रांतीच्या या अभूतपूर्व यशाने तिच्या ‘घुवारा’ या मूळ गावात आता एक मोठे वैचारिक परिवर्तन घडवून आणले आहे. तिच्या यशाने प्रेरित होऊन गावात चक्क एक क्रिकेट अकादमी सुरू झाली असून, अनेक लहान मुलींनी आता बॅट-बॉल हातात घेतला आहे. विशेष म्हणजे, पूर्वी मुलींच्या खेळण्यावर आक्षेप घेणारे गावातील पालकच आता स्वतःहून आपल्या मुलींना क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, याचा तिला अभिमान वाटतो. एक वेगवान गोलंदाज म्हणून मैदानावर टिकून राहण्यासाठी फिटनेस राखणे आणि दुखापतींपासून दूर राहणे किती महत्त्वाचे आहे, यावरही क्रांतीने प्रकाश टाकला. दरम्यान, हिंदुस्थानचा टी-२० विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धचा महत्त्वाचा सामना 25 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. जिथे क्रांती पुन्हा एकदा देशासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी देण्यास उत्सुक आहे.