FIFA World Cup 2026 – ब्राझीलचा तिहेरी हल्ला, स्कॉटलंडचा 3-0 ने धुव्वा उडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्राझीलने फिफा वर्ल्ड कपच्या महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडवर तिहेरी हल्ला चढवला.  हार्ड रॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ब्राझीलने स्कॉटलंडचा 3-0 असा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले.  ब्राझीलचा स्टार खेळाडू विनिसियस ज्युनियर विजयाचा शिल्पकार ठरला, कारण त्याने दोन गोल केले. स्पर्धेतील हा विनिसियसचा चौथा गोल होता आणि या गोलमुळे तो ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत सामील झाला. त्याने किलियन एमबाप्पे आणि आर्ंलग हालंड यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

या सामन्याने नेमारचे दीर्घ कालावधीनंतर ब्राझील संघात पुनरागमन झाले. ब्राझीलने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि स्कॉटलंडवर सतत दबाव ठेवला. सहाव्या मिनिटाला ब्राझीलने 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या गोलनंतरही ब्राझीलचे वर्चस्व कायम राहिले. विनिसियसने आणखी एक गोल केला होता, परंतु व्हिडीओ असिस्टंट रेफरी तपासणीनंतर फाऊलमुळे तो गोल अवैध ठरवण्यात आला. मात्र, पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत विनिसियसने संधीचे सोने केले आणि ब्राझीलला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. ब्रुनो गिमारेसच्या उत्कृष्ट क्रॉसवर विनिसियसने एक अप्रतिम हेडर मारला.

ब्राझीलचा संघ फक्त यावर थांबला नाही, तर मॅथियस कुन्हाने अजून एक गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे ब्राझीलने बाद फेरीत आपले स्थान निश्चित केले. ब्राझीलचा संघ ‘क’ गटात प्रथम आला.