
कर्नाटकातील तुमकूरू जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेकअपमुळे संतापलेल्या एका तरुणाने तो व त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रवास करत असलेल्या कारमध्येच बॉम्बस्फोट घडवून आणला. “एकत्र जगू शकलो नाही, तर एकत्र मरू” या वेडापायी या तरुणाने हा बॉम्बस्फोट घडवला. मात्र या स्फोटाच्या काही सेकंद आधी तरुणीने धावत्या कारमधून बाहेर उडी मारल्याने ती बचावली, तर या भीषण स्फोटात तो तरुण स्वतः कारमध्येच जिवंत होरपळला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. .
ही घटना शनिवारी तुमकूरू जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील जोगीहळ्ळीजवळ राष्ट्रीय महामार्ग-४८ वर घडली. नागेंद्र (वय ३०) असे मृत आरोपीचे नाव आहे. या घटनेत त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि कॅब चालक प्रवीण हे दोघे जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेंद्र आणि ती तरुणी हे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही वैयक्तिक वादामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. तरुणीने नागेंद्रचा फोन नंबरही ब्लॉक केला होता. याच रागातून शनिवारी सकाळी नागेंद्रने बंगळुरूच्या जयनगर भागातील तिच्या भाड्याच्या खोलीवर जाऊन वाद घातला आणि तिला जबरदस्तीने एका कॅबमध्ये बसवून तिचे अपहरण केले. तरुणी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी जयनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रारही नोंदवली होती.
कार अकोल्याच्या दिशेने जात असताना नागेंद्रने तिला “मी तुलाही मारून टाकेन आणि स्वतःही मरेन,” अशी धमकी दिली. त्याच्याकडे काहीतरी स्फोटक पदार्थ असल्याचेही त्याने तिला दाखवले होते. जोगीहळ्ळीजवळ पोहोचताच नागेंद्रने कारमध्येच तिच्यावर चाकूने हल्ला केला. यामुळे घाबरलेल्या चालकाने तात्काळ कार थांबवली. याच संधीचा फायदा घेत तरुणीने कारचे दार उघडून बाहेर उडी मारली.
तरुणी कारमधून बाहेर पडताच, काही सेकंदातच कारमध्ये तीव्र क्षमतेचा स्फोट झाला आणि कारने पेट घेतला. हा स्फोट इतका भीषण होता की नागेंद्रला कारबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि तो आतमध्येच होरपळला. या स्फोटामुळे राष्ट्रीय महामार्गावर तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांचा तपास सुरू
तुमकूरूचे पोलीस अधीक्षक अशोक के.व्ही. यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार नागेंद्रने स्वतःसोबत स्फोटक आणले होते आणि त्यानेच हा स्फोट घडवून आणला. पोलिसांना घटनास्थळी बॉम्बसदृश स्फोटक साहित्य सापडले असून, त्याने हे स्फोटक कुठून आणले आणि स्फोट कसा घडवला, याचा सखोल तपास कल्लामबेल्ला पोलीस करत आहेत.






















































