‘एक रुपया सेल ‘साठी झुंबड मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये चेंगराचेंगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये ‘एक रुपया सेल’चे रील समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून गर्दी नियंत्रणात आणली. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

इन्फिनिटी मॉलमध्ये असलेल्या ‘न्यू मी’ या फॅशन स्टोअरने एक रुपयात सेल जाहीर केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो पाहून हजारो तरुण-तरुणींची झुंबड शनिवारी इन्फिनिटीमध्ये लोटली.

अनेकजण गुदमरले
प्रचंड गर्दीमुळे अनेक जणांना गुदमरल्यासारखे झाले होते. गर्दीला आवरताना सुरक्षा रक्षकांच्याही नाकीनऊ आले. गर्दीमध्ये तरुणींची संख्याही मोठी असल्याने त्यांना नियंत्रण आणणे कठीण झाले. त्यामुळ पोलिसांना बोलवावे लागले. स्टोअरबाहेर गर्दी पाहून ‘न्यू मी’ स्टोअरवाल्यांनीही दुकानाचे शटर बंद करून घेतले. गर्दी अनावर झाल्याने मॉल प्रशासनानेही ती ऑफर रद्द केल्याचे लाऊडस्पीकरवरून जाहीर केले. त्यानंतर हळूहळू गर्दी पांगली आणि मॉल प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.