सावधान! WhatsApp वरचा ‘हा’ एक मेसेज आणि बँक खाते होईल साफ; सरकारी यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या सायबर धोक्यांची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ‘इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर’ने (I4C) निवेदन जारी केले असून नागरिकांना फसव्या मेसेजपासून अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या या फसवणुकीची सुरुवात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने होते. सायबर गुन्हेगार सर्वात आधी युजर्सना त्यांच्या संमतीशिवाय अनोळखी व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये समाविष्ट करतात. या ग्रुप्समध्ये स्वतःला शेअर बाजार तज्ज्ञ, नामवंत आर्थिक कंपन्यांचे प्रतिनिधी किंवा अनुभवी गुंतवणूक सल्लागार म्हणवून घेणारे लोक सक्रिय असतात. हे तोतया तज्ज्ञ दररोज बाजारातील घडामोडींचा बहाणा करून ‘व्हीआयपी स्टॉक टिप्स’ आणि गुंतवणुकीच्या नवनवीन योजनांचे दावे ग्रुपवर शेअर करू लागतात, जेणेकरून नवीन सदस्यांचा विश्वास संपादन करता येईल.

विश्वास संपादन करण्यासाठी या ग्रुप्समध्ये दररोज खोट्या नफ्याचे स्क्रीनशॉट आणि बोगस आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, या ग्रुप्समध्ये आधीपासूनच असलेले इतर अनेक सदस्यही या सायबर टोळीचेच भाग असतात. आम्ही या टिप्सचा वापर करून लाखो रुपयांचा नफा कमावला, असे भासवणारे मेसेज हे बनावट सदस्य सातत्याने टाकत असतात. या खोट्या यशाच्या कथांना आणि चक्रावून टाकणाऱ्या स्क्रीनशॉट्सना बळी पडून अनेक जण आपल्या कष्टाची कमाई अशा बनावट योजनांमध्ये गुंतवण्यास तयार होतात.

इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर’ने (I4C) आपल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केली. त्यात म्हटले की, शेअर बाजार किंवा कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीवर ‘गॅरंटीड रिटर्न्स’ (निश्चित आणि खात्रीशीर नफा) मिळण्याचा दावा करणे हाच सर्वात मोठा फसवणुकीचा संकेत आहे. शेअर बाजारातील व्यवहार हे पूर्णपणे स्वजबाबदारीवर असतात. त्यामुळे कोणतीही अधिकृत संस्था, नोंदणीकृत ब्रोकर किंवा कायदेशीर गुंतवणूक सल्लागार अशा प्रकारे अवास्तव आणि हमीयुक्त परताव्याचे आश्वासन कधीही देऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या सायबर जाळ्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून अपरिचित किंवा अनधिकृत ट्रेडिंग ॲप्स डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावरील कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये. जर कोणाची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक झाली असेल, तर त्यांनी त्वरित राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर (cybercrime.gov.in) आपली तक्रार नोंदवावी किंवा 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागावी.