
राजस्थानमधील बिकानेर येथील पीबीएम (PBM) रुग्णालयात धक्कादायक घटना घडली. येथे सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर महिनाभर झुंज देणाऱ्या 25 वर्षीय महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. या रुग्णालयातील बाळंतीणीच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे गेल्या तीन महिन्यांत राजस्थानमधील माता मृत्यूंची एकूण संख्या आता 19 वर पोहोचली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सिझेरियननंतर तब्येत खालावली
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कमला मेघवाल असे मृत महिलेचे नाव असून तिला 8 जून रोजी पीबीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. कमला ही मधुमेहाने ग्रस्त होती आणि तिची ही तिसरी गर्भधारणा होती. 8 जून रोजी तिच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरुवातीला माता आणि बाळ दोघेही व्यवस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी कमलाची प्रकृती अचानक खालावली. डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर दीर्घकाळ उपचार केले. परंतु तिची प्रकृती बिघडतच गेली.
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाच्या यापूर्वी दोन सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या होत्या, यामुळे तिसऱ्यांदाही सिझेरियन करणे वैद्यकीयदृष्ट्या गरजेचे होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी, 9 जून रोजी तिला लघवी होणे बंद झाले. त्यामुळे तिला तात्काळ डायलिसिसवर ठेवण्यात आले. काही काळासाठी तिच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि तिला व्हेंटिलेटरवरूनही काढण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सिझेरियनच्या टाक्यांशी संबंधित आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र यानंतर तिची तब्येत अधिक बिघडत गेली. शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे मंगळवारी तिचा मृत्यू झाला. सुदैवाने तिचे नवजात बाळ सुरक्षित आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने कमलाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अलीकडच्या आठवड्यात या रुग्णालयात प्रसूतीनंतर 6 महिलांना या त्रासाचा सामना करावा लागला होता. त्यापैकी कमलासह तिघींचा मृत्यू झाला, तर इतर तिघी उपचारांनंतर बऱ्या होऊन घरी परतल्या. यापूर्वी 19 जून रोजी प्रीती (वय 20) आणि 21 जून रोजी शारदा (वय 26) या दोन महिलांचाही प्रसूतीनंतर मूत्रपिंड निकामी झाल्याने आणि लघवी बंद झाल्याने मृत्यू झाला होता, अशी माहिती पीबीएम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी.सी. घिया यांनी दिली.


























































