
मुंबईत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एका पोलीस शिपायाच्या वादग्रस्त कृत्यामुळे वादंग उठले आहे. परत इथे फिरून यायचे नाही. मी खूप बेकार आहे, 50 ग्रॅम पावडर खिशात ठेवीन, मग गेलास, कायमचा गेलास अशी धमकी पोलीस शिपायाने आंदोलक विद्यार्थ्यांना दिल्याने खळबळ उडाली आहे. पवन साबळे असे या पोलिसाचे नाव आहे. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून साबळे याची शीव पोलीस ठाण्यातून हटवून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
आपल्या न्याय्य हक्कासाठी कसलीही पर्वा न करता जेन झी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांकडून अमानुष मारहाण झाली. पण मुंबई पोलिसांनी संयम राखत दिल्ली पोलिसांसारखे केले नाही. त्यामुळे बुधवारी छत्रपती शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस झिंदाबादच्या घोषणा देत कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबई पोलिसांप्रती सगळीकडून आभार व्यक्त होत असताना एका पोलीस शिपायाच्या कृत्यामुळे डाग लागण्याचे काम झाले आहे. काही आंदोलकांना पोलिसांच्या गाडीत कोंबून घेऊन नेले जात होते. त्यावेळी विद्यार्थ्याने गाडीतला व्हिडीओ काढला. त्यामुळे गाडी चालक पोलीस शिपाई कशाप्रकारे विद्यार्थ्यांना धमकावतोय ते सर्वांसमोर आले.
परत इकडे येऊ नका, मी खूप बेकार आहे, 50 ग्रॅमची पावडर खिशात टाकीन मग गेलास समज, कायमचा गेलास अशी धमकीच त्या पोलिसाने विद्यार्थ्यांना दिली. पवन साबळे असे पोलिसाचे नाव असून तो शीव पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत होता. त्याचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला तत्काळ तेथून हटवत त्याची चौकशी सुरू केली आहे.
ही गुंडगिरी राज्य सरकारला मान्य आहे का? सुप्रिया सुळे यांचा सवाल
मुंबईत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. लाठीहल्ल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना थेट खिशात ड्रग्जच्या पुडय़ा टाकून खोटय़ा गुन्ह्यांत अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ही गुंडगिरी राज्य सरकारला मान्य आहे का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणारी ही दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. pic.twitter.com/dLIUcYcFYZ
— Saamana Online (@SaamanaOnline) July 23, 2026

























































