
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील पांगी भागात शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. डोंगराचा मलबा टाटा सुमोवर कोसळल्याने सहा महिन्यांच्या बालकासह 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच टिंडी पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी दाखल होत मदत आणि बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेत गाडीचा चक्काचूर झाला.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, उदयपूर-किलाड रस्ता गुरुवारी बंद होता, त्यामुळे वाहनातील सर्व प्रवासी टिंडीमध्ये अडकले होते. शुक्रवारी रस्ता पुन्हा सुरू झाल्यानंतर ते पांगीच्या दिशेने निघाले. यादरम्यान किलाड-उदयपूर रस्त्यावरील काडू नालाजवळ डोंगराचा मोठा मलबा अचानक टाटा सुमोवर कोसळला.
प्राथमिक तपासानुसार, सुमो टॅक्सीमध्ये एकूण 15 जण होते. यापैकी 6 महिन्यांच्या बाळासह 13 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी झाले. बचाव पथके मलबा हटवण्याचे काम करत आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.



























































