
कलाकार आपल्या कलेपासून कितीही कठीण परिस्थितीतही दूर जात नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा गायक सोनू निगम याने दिला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमधून सोनू निगमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, वेदना होत असतानाही सोनूने त्याचे गाणे थांबवले नाही. आवडते गायक आणि गुरू मोहम्मद रफी यांचे प्रसिद्ध गाणे गाऊन डॉक्टर आणि त्यांच्या टीमला अनोख्या पद्धतीने धन्यवाद दिले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनू निगम हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये बेडवर दिसत आहे. आजूबाजूला डॉक्टर आणि वैद्यकीय पथक असून उपचारांची प्रक्रिया सुरू आहे. या कठीण परिस्थितीतही सोनू निगम ‘दुलारी’ चित्रपटातील मोहम्मद रफी यांचे अजरामर गाणे ‘सुहानी रात ढल चुकी’ गाताना दिसतो. सोनूच्या आवाजातून वेदना जाणवत असल्या तरी त्याचा सूर मात्र कायम आहे. डॉक्टर आणि त्यांच्या टीमसमोरच त्याने हे गाणे सादर केले. त्यामुळे हा व्हिडिओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
सोनू निगमने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना तो आपली शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर निलेश सातभाई आणि त्यांच्या टीमला समर्पित केला. त्याने लिहिले की, शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर आणि त्यांच्या टीमसाठी हे खास सादरीकरण आहे. तसेच ‘वेदनेत गाणे हा देखील संगीताचा आनंद आहे’, असेही त्याने म्हटले आहे. सोनूच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्या धैर्याचे आणि संगीतावरील प्रेमाचे कौतुक केले. तसेच चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
सोनू निगमला नेमके काय झाले?
सोनू निगमने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. त्याला मानेजवळील नस दबल्यामुळे त्रास होत असल्याचे त्याने सांगितले होते. या समस्येमुळे त्याला एमआरआय, सीटी स्कॅन आणि फिजिओथेरपी करावी लागली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया नेमक्या कोणत्या वैद्यकीय कारणासाठी करण्यात आली, याबाबत अद्याप सविस्तर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


























































