गटारीचा संडे बेत… चिकन मटणावर मजबूत ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार दिवसांवर श्रावण महिना येऊन ठेपला आहे. श्रावण महिन्यात चिकन-मटण खाता येणार नसल्याने मुंबईकरांनी रविवारी गटारीचा संडे बेत आखला आणि चिकन मटणावर मजबूत ताव मारला. मटणाचा प्रतिकिलो दर ९०० ते १००० रुपयांच्या घरात गेला असतानाही मुंबईकरांनी ‘फुल्ल’ जोशात गटारी साजरी केली. वारंवारच्या दरवाढीला ‘दे धक्का’ म्हणत मांसाहारींनी चिकन, मटणाच्या दुकांनाबाहेर रांगा लावल्या. अनेकांनी चिकन-मटणची ऑनलाइन ऑर्डर दिली. ग्राहकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे नेहमीपेक्षा दुप्पट चिकन आणि मटणाची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

श्रावण महिन्यापासून सणासुदीला सुरुवात होते. या पवित्र महिन्यात अनेक घरांमध्ये मांसाहार टाळला जातो. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी गटारी साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा मुंबईकरांनी रविवारी गटारीचा बेत आखला. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत गटारीच्या पार्थ्यांचा आनंद मुंबईकरांनी लुटला. विशेष म्हणजे, इतर वस्तूंप्रमाणेच चिकन, मटणाचे दर प्रचंड वाढले आहेत.

गटारीला मटण खाण्यास अधिक पसंती दिली जाते. याच मटणाचा किलोचा भाव ९०० ते १००० रुपयांच्या घरात गेला आहे. मात्र गटारी साजरी करण्याच्या उत्साहापुढे मुंबईकरांनी दरवाढीची पर्वा केली नाही आणि सकाळपासूनच चिकन, मटणाच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या. शहर आणि उपनगरांत सर्वत्र रांगांचे चित्र होते. गुरुवार, १३ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. मात्र त्याआधी केवळ बुधवार हा एकमेव मांसाहाराचा दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आम्ही रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी गटारी साजरी केली, असे कांदिवलीतील विकास पाताडे यांनी सांगितले.

प्रभादेवीतील मटण विक्रेते मोहम्मद सैद यांनी दरदिवशीपेक्षा दुप्पट मटण विक्री झाल्याची माहिती दिली. रविवारी एकादशी असूनही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे मटण विक्रेत्यांनी सांगितले. श्रावण मास सुरू होत असल्याने शेवटच्या रविवारी चिकन-मटण खरेदीसाठी दुकानांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

अनेकांचे हॉटेलमध्ये गटारी सेलिब्रेशन
मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांनी हॉटेलमध्ये गटारी सेलिब्रेशन केले. त्यामुळे दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नामांकित हॉटेलमध्ये मुंबईकरांची मोठी गर्दी झाली होती. मद्यप्रेमींनी गटारीच्या निमित्ताने ओली पार्टी साजरी केली, तर कित्येक तरुणांनी मुंबईबाहेर पिकनिकचा प्लान करून तेथे गटारीचा आनंद लुटला.