चीनच्या भूमीत हिंदुस्थानी तिरंगा! सात्त्विक-चिराग जोडीची सुपर कामगिरी; चिनी जोडीला धूळ चारत चायना मास्टर्सवर कब्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनच्या भूमीत हिंदुस्थानी बॅडमिंटनचा पुन्हा एकदा डंका वाजला. पुरुष दुहेरीतील स्टार जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेच्या विजेतेपदावर दिमाखात नाव कोरले. पहिला गेम गमावल्यानंतरही खचून न जाता हिंदुस्थानी जोडीने जबरदस्त पुनरागमन करत यजमान चीनच्या हे जी तिंग आणि रेन शियांग यू यांचा 11-21, 21-13, 21-17 असा तीन गेममध्ये धुव्वा उडवला.

घरच्या प्रेक्षकांचा कर्णकर्कश पाठिंबा, पहिल्या गेममधील पराभव आणि चिनी जोडीचा आक्रमक मारा… या सर्वांना सात्त्विक-चिराग यांनी आपल्या झंझावाती खेळाने उत्तर दिले. दुसरा गेम जिंकून सामन्यात पुनरागमन केल्यानंतर निर्णायक गेममध्येही त्यांनी संयम, आक्रमकता आणि अचूक समन्वय कायम ठेवला. अखेर 21-17 अशी निर्णायक आघाडी घेत हिंदुस्थानी जोडीने चायना मास्टर्सच्या ट्रॉफीला अखेर गवसणी घातली.

दोनदा हुलकावणी; मात्र आता ट्रॉफीवरच शिक्कामोर्तब!

चायना मास्टर्सची ट्रॉफी सात्त्विक-चिराग यांच्यासाठी आतापर्यंत दूरच राहिली होती. 2023 आणि 2025 मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली; मात्र दोन्ही वेळा विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. यंदा पुन्हा अंतिम फेरीत समोर होते तेही चीनचेच खेळाडू. त्यामुळे घरच्या मैदानाचा फायदा चिनी जोडीला मिळणार अशी शक्यता होती. मात्र सात्त्विक-चिराग यांनी या दबावाला केराची टोपली दाखवत तिसऱया प्रयत्नात चायना मास्टर्सवर कब्जा केला.

पहिला गेम चीनचा; मग हिंदुस्थानी वादळ!

हे जी तिंग आणि रेन शियांग यू यांनी पहिल्याच गेमपासून आक्रमक खेळ करत सात्त्विक-चिराग यांना बचावाच्या भूमिकेत ढकलले. हिंदुस्थानी जोडीच्या खेळातील काही चुका हेरत चिनी जोडीने 21-11 असा पहिला गेम सहज खिशात घातला. पण सामना इथेच संपणार नव्हता. दुसऱया गेममध्ये सात्त्विक-चिराग यांनी अक्षरशः गियर बदलला. कोर्टवरील समन्वय अधिक धारदार झाला, स्मॅशचा मारा वाढला आणि प्रत्येक रॅलीमध्ये चिनी जोडीवर दबाव निर्माण होऊ लागला. हिंदुस्थानी जोडीच्या वेगवान खेळापुढे चीनच्या खेळाडूंची भंबेरी उडाली. सात्त्विक-चिराग यांनी 21-13 असा गेम जिंकत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. मग तिसरा गेममध्येही झुंज देत 21-17 अशी बाजी मारली आणि चीनच्या भूमीत हिंदुस्थानी तिरंगा डौलाने फडकला.

एन से यंगची चीनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक

महिला एकेरीत दक्षिण कोरियाची जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू एन से यंग हिनेही चीनच्या भूमीत आपला दबदबा कायम राखला. तिने जपानच्या टोमोका मियाजाकी हिचा 21-17, 21-6 असा सरळ गेममध्ये पराभव करत सलग तिसऱयांदा चायना मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. या विजयासह एन से यंगने चायना मास्टर्समध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणारी पहिली खेळाडू होण्याचा पराक्रम केला. या मोसमातील हे तिचे सातवे वैयक्तिक विजेतेपद ठरले. मियाजाकीविरुद्ध तिचा विजयी धडाका आता 8-0 असा झाला आहे.

 

मोसमातील दुसरे वर्ल्ड टूर जेतेपद

चायना मास्टर्सचे हे विजेतेपद सात्त्विक-चिराग यांचे या मोसमातील दुसरे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर जेतेपद ठरले. यापूर्वी त्यांनी सिंगापूर ओपनवरही आपले नाव कोरले आहे. आगामी 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये मिळवलेले हे सुपर 750 विजेतेपद त्यांच्या आत्मविश्वासाला मोठी झेप देणारे ठरले आहे.