गावी जाण्याच्या ओढीने चिमुकलीने गाठले कल्याण स्थानक; खाऊसाठी 10 रुपये घेऊन घराबाहेर पडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खाऊ आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडलेल्या १२ वर्षीय चिमुकलीने आजीकडे गावी जाण्यासाठी थेट कल्याण रेल्वे स्थानक गाठले. विशेष म्हणजे आईकडून १० रुपये घेऊन ही मुलगी घराबाहेर पडली होती. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही चिमुकली सुखरूप सापडली. पिसवली परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले.

आडिवली-ढोकळी परिसरात राहणारी आरुषी ही लहानपणापासून हिंगोली जिल्ह्यातील माहेरखेडा या मूळ गावी आजीकडे राहत होती. जुलै महिन्यात पुढील शिक्षणासाठी तिला कल्याण येथे आणण्यात आले होते. मात्र तिचे येथे मन रमत नसल्याने ती सतत गावी जाण्याचा हट्ट करत होती. गुरुवारी दुपारी आईकडून खाऊसाठी १० रुपये घेऊन दुकानात जाते असे सांगून ती घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती घरी न परतल्याने पालकांनी परिसरात शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने आईने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पालकांच्या स्वाधीन

आरुषी कल्याण रेल्वे स्थानकावर एकटीच फिरत असताना कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर ती बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. मानपाडा आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या समन्वयातून तिची खातरजमा करून सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगी सुरक्षितपणे परत मिळाल्याने पालकांनी पोलिसांचे आभार मानले.