
हिंदुस्थानात पॅसिव्ह धूम्रपानामुळे होणाऱ्या अकाली मृत्युंच्या संख्येत मोठी आणि चिंताजनक वाढ झाली आहे. 1990 च्या तुलनेत या मृत्यूंमध्ये जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली असून केवळ 2023 या एकाच वर्षात तब्बल 3 लाख 25 हजार 600 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ‘द लॅन्सेट पब्लिक हेल्थ’ या प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकात सोमवारी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार 2023 मध्ये अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत हिंदुस्थान जगात दुसऱ्या क्रमांकावर असून देशातील सुमारे 44 कोटी 40 लाख लोकांना याचा थेट फटका बसला आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
अभ्यासातील माहितीनुसार, हिंदुस्थानातील वयानुसार प्रमाणित संसर्ग दर गेल्या तीन दशकांत 43.2 टक्क्यांवरून 30.6 टक्क्यांपर्यंत खाली आला असला, तरी देशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे बाधित व्यक्तींची प्रत्यक्ष संख्या प्रचंड वाढली आहे. 1990 मध्ये अप्रत्यक्ष धूम्रपानाचा फटका बसणाऱ्यांची संख्या 37 कोटी 50 लाख होती, ती 2023 मध्ये वाढून 44 कोटी 40 लाखांवर पोहोचली. या वाढत्या संख्येचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून मृत्यूच्या संख्येतही मोठी भर पडली आहे. 1990 मध्ये या कारणामुळे 2 लाख 17 हजार 700 मृत्यू झाले होते, ते 2023 पर्यंत 3 लाख 25 हजार 600 वर गेले. यात महिलांमधील मृत्यूची संख्या 1 लाख 13 हजार 400 वरून 1 लाख 56 हजार 900 झाली आहे, तर पुरुषांमधील मृत्यूची संख्या 1 लाख 4 हजार 300 वरून थेट 1 लाख 68 हजार 700 पर्यंत पोहोचली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे 2023 मध्ये हिंदुस्थानात सुमारे 92.8 लाख दिव्यांग-समायोजित आयुर्मान वर्षे (DALYs) गमावली आहेत, जी अकाली मृत्यू आणि आजारपणामुळे वाया गेलेली निरोगी वर्षे दर्शवतात.
आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार लहान मुले आणि महिला या पॅसिव्ह धूम्रपानाच्या सर्वात मोठ्या बळी ठरत आहेत. लहान मुलांची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे त्यांना श्वसनाच्या गंभीर आजारांचा धोका सर्वाधिक असतो. लहान मुलांमध्ये खालच्या श्वसनमार्गाचा संसर्ग हे आजारपणाचे मुख्य कारण ठरत आहे. अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे इस्केमिक हृदयरोग, स्ट्रोक, फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, स्तनाचा कर्करोग, टाईप-२ मधुमेह आणि दमा यांसारख्या अत्यंत जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे धूम्रपान केवळ मोकळ्या जागेतच केले जावे आणि सार्वजनिक ठिकाणी याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण केली जावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
जागतिक स्तराचा विचार करता, 2023 या वर्षात जगभरात सुमारे 2.71 अब्ज लोक अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कात आले होते. यामुळे जगभरात 16.6 लाख लोकांचा मृत्यू झाला असून 44.8 दशलक्ष निरोगी वर्षे गमावली गेली आहेत. जगातील एकूण बाधित लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही एकट्या चीन, भारत आणि इंडोनेशिया या तीन देशांमध्ये राहते. यापैकी सर्वाधिक 66 कोटी 40 लाख बाधित लोकांसह चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

























































