
विद्रोह हा माणसाला माणसाशी जोडणारा असावा, मनातील विषमतेविरुद्ध दंगल घडली पाहिजे. आज राजकारणात विचार मेला आहे. पक्ष फोडले जात आहेत, निष्ठा विकल्या जात आहेत. ही राजकारणाची शोकांतिका, पण रिंगणात तुमच्यासारखे झुंजणारे वाघ असतील तर येणारे दिवस आपलेच आहेत, अशा जहाल शब्दात विद्रोही दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी नांदेडमधील किनवट येथे व्यवस्थेवर हल्लाबोल केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त साई वंदना मंगल कार्यालयात सोमवारी रात्री त्यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चंदनशिवे बोलत होते. सर्वप्रथम किनवट शहरात जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे दाखल होताच आदिवासी दंडार नृत्याने व बंजारा वेशभूषेतील कलाकारांनी डफडे वाजवून व कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या साह्याने पुष्पवर्षाव करून जंगी स्वागत केले.
मित्रांनो, विद्रोह हा शब्द आज बदनाम केला गेला आहे. विद्रोह म्हणजे जाळपोळ, तोडफोड असे चित्र उभे केले जाते. पण माझा विद्रोह हा पेट्रोल टाकून माणसे जाळणारा नाही तर मेंदूतील अंधार जाळणारा आहे. मी कवितेतून दंगल घडवतो. ती दंगल जातीविरुद्ध नाही तर जातीव्यवस्थेविरुद्ध आहे. ती दंगल धर्माविरुद्ध नाही तर धर्मांधतेविरुद्ध आहे. आज देशाच्या राजकारणाची अवस्था अत्यंत वाईट आहे. विचारधारा संपली आहे. पक्ष फुटत आहेत, निष्ठा विकली जात आहे. सत्तेचा बाजार मांडला आहे. अशा काळात ज्योतिबा खराटे यांच्यासारखा निष्ठावंत नेता हा आदर्श आहे. 23 वर्षे रक्तदान करून वाढदिवस साजरा करणारा नेता मी पहिल्यांदा पाहिला. आजचा तरुण इतिहास विसरला आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीत. तो फक्त इन्स्टाग्रामच्या रिल्स आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये अडकला आहे. त्याचे वाचन संपले आहे. जोपर्यंत तरुण वाचणार नाही तोपर्यंत तो घडणार नाही आणि घडल्याशिवाय तो लढणार नाही, अशा भावनाही चंदनशिवे यांनी व्यक्त केल्या.
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि शिवसैनिकांच्या जीवाच्या बाजीने आपण किनवट नगरपरिषद आणि माहूर नगरपंचायत दोन्ही काबीज केल्या आहेत. ही माझी नाही तर प्रत्येक शिवसैनिकाची निष्ठा आहे. येणार्या काळात किनवट-माहूर विधानसभा सुद्धा आपण भगवी केल्याशिवाय राहणार नाही. माझा वाढदिवस हा खुर्चीचा सोहळा नसून जनसेवेची शपथ आहे. गेली 23 वर्षे रक्तदानातून वाढदिवस साजरा करतो, यापुढेही जनतेच्या सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहीन, असे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे म्हणाले.


























































