
मराठा आरक्षणासाठी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. सुनील विनायक बिरादार (42) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. संतप्त गावकरी आणि नातेवाईकांनी उदगीर-लातूर मुख्य रस्त्यावर मोड येथे मृतदेह ठेवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुमठाणा येथील सुनील बिरादार यांनी गावातीलच विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध घेतला असता, त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट आढळली. त्यात त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचे नमूद केले होते.
मृतदेह विहिरीबाहेर काढल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी प्रशासकीय दिरंगाईविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. गावकऱ्यांनी मृतदेह थेट उदगीर-लातूर मुख्य महामार्गावर आणून ठेवला आणि वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. जोपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन मागण्या मान्य करत नाहीत, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.
मयत सुनील बिरादार यांच्या कुटुंबातील एका सदस्याला तत्काळ शासकीय सेवेत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन द्यावे. मराठा समाजाला सरसकट कुणबी/जात प्रमाणपत्र वाटप करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लेखी द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सुनील बिरादार यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आई-वडील असा परिवार आहे.


























































