दिल्लीचे माजी मुख्य सचिव राकेश मेहता यांनी जीवन संपवलं, नोएडातील राहत्या घरी आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचे माजी मुख्य सचिव आणि 1975 च्या बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी, राकेश मेहता यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. मृतदेह नोएडाच्या सेक्टर 82, केंद्र विहार-2 सोसायटी येथील फ्लॅटमध्ये राकेश मेहता यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट हस्तगत करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या नोटमध्ये मानसिक तणाव आणि अनेक शारीरिक आजारांचा उल्लेख आहे. तथापि, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश मेहता यांच्या पत्नी सुमंती मेहता या देखील एक निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्या आपल्या मुलाला भेटायला डेहराडूनला गेल्या होत्या. मेहता यांना एक मुलगी असून, ती परदेशात राहते. शनिवारी, सुमंती मेहता यांनी आपल्या पतीला फोन केला, परंतु वारंवार प्रयत्न करूनही फोन उचलला नाही. त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यानंतर त्या डेहराडूनहून नोएडाला परतल्या.

घरी पोहोचल्यावर फ्लॅटचा दरवाजा आतून बंद आढळला. वारंवार प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नव्हता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता आत राकेश मेहता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात मानसिक तणाव आणि काही शारीरिक आजार असल्याचे समोर आले आहे.