हल्द्वानीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण, अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील हल्द्वानी रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर झालेल्या शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वकील अंजू यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 196 आणि 299 तसेच अनुसूचित जाती/जमाती कायद्याच्या कलम 3(1)(आर) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपांमध्ये जातीय भेदभाव, सामाजिक अपमान आणि अनुसूचित जातीच्या व्यक्तीबद्दल द्वेष व तिरस्कार बाळगणे यांचा समावेश आहे. हल्द्वानीचे पोलीस अधीक्षक (गुन्हे), डॉ. जगदीश चंद्र, या प्रकरणाचा तपास करतील.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, 8 ऑगस्ट रोजी रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर, 10 ऑगस्ट रोजी काही लोकांनी त्याच ठिकाणी तथाकथित शुद्धीकरण विधी केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या शुद्धीकरण विधीमुळे जातीय भेदभावाला प्रोत्साहन मिळाले आणि एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा अपमान झाला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर एका दिशाभूल करणाऱ्या आणि संभाव्यतः संपादित व्हिडिओद्वारे धार्मिक द्वेष भडकवल्याचेही आरोप आहेत. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.