अ‍ॅमेझॉन डेटा सेंटरचा इतकाच पुळका असेल तर ते दरे गावात घेऊन जा! आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळकुममध्ये होऊ घातलेल्या डेटा सेंटरमधून दिवसरात्र भयंकर उष्णता निर्माण होणार आहे. चोवीस तास 90 डेसिबल इतका आवाज निघणार आहे. या सेंटरसाठी रोज 13 एमएलडी पाण्याची नासाडी होणार आहे आणि या प्रकल्पात नोकऱ्या मिळणार किती तर फक्त 75. हे डेटा सेंटर आणि रिंगरूट मेट्रो प्रकल्प मागितलेत तरी कुणी, ठाणेकरांना तुम्ही विचारले का? असा सवाल करतानाच या डेटा सेंटरचा इतकाच पुळका आला असेल तर हा प्रकल्प दरे गावात पाठवा, जनतेच्या जिवावर उठणारा प्रकल्प हद्दपार करणारच, असा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून केला.

ठाण्यातील बाळकुम परिसरात प्रस्तावित असलेल्या अॅमेझॉनच्या हायपर स्केल डेटा सेंटर प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. बाळकुम येथे 54 एकर भूखंडावर हा प्रकल्प नियोजित केला आहे. भरवस्तीत येणाऱ्या या प्रकल्पामुळे आरोग्यावर तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार आहे. पाणी, वीज आणि वाहतूक या पायाभूत सुविधांवरही प्रचंड ताण येणार आहे. अवघ्या 75 नोकऱ्यांसाठी लाखो ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकल्पच नको अशी भूमिका घेणाऱ्या ठाणेकरांच्या लढय़ाला बळ देण्यासाठी आदित्य ठाकरे ठाण्यात आले होते.

आदित्य ठाकरे यांनी अमेझॉन डेटा सेंटर आणि रिंगरूट मेट्रोविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रकल्प लादणाऱ्या सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ठाण्यात पाणीटंचाई असताना डेटा सेंटरच्या कुलिंगसाठी रोज 12 ते 13 एमएलडी पाणी लागणार आहे. एसीमधून बाहेर पडणारी गरम हवा कोणाच्या घरात जाणार? 24 तासातील प्रत्येक सेपंद हे डेटा सेंटर वीज खेचणार आहे. हे सेंटर चालवायला 5 लाख लिटर डिझेलचा साठा करावा लागेल यासारखी अनेक संकटे ठाणेकरांसमोर भविष्यात उभी राहतील अशी धोक्याची घंटा आदित्य ठाकरे यांनी वाजवली.

सगळा डेटा परदेशात जाणार

या डेटा सेंटरमधील सगळा डेटा हा परदेशात वापरला जाणार आहे. आणि इतके सगळे होऊन जर हजार, दीड हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तर ठीक होतं. पण दोन शिफ्टमध्ये फक्त 75 जणांना नोकऱ्या मिळणार आहेत. मग भरवस्तीत या प्रकल्पाचा अट्टहास कशासाठी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिष गाढवे, नगरसेवक शहाजी खुस्पे, ओवळा-माजीवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, राजेंद्र महाडिक, सुनील पाटील, रेखा खोपकर, प्रमिला भांगे, प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.

रिंगरूट प्रकल्प कॉन्ट्रक्टरचे लाड करण्यासाठी

ठाण्याची ओळख झाडांचे शहर अशी आहे. मात्र ठाण्यातील सुमारे साडेतीन हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. काँक्रीटीकरणामुळे उष्णता वाढणार आहे. आधीच ठाणेकरांची मेट्रो 12 वर्षे रखडली असताना नव्या रिंगरूट मेट्रो प्रकल्पाचा सरकारने घाट घातला आहे. या प्रकल्पालाही ठाणेकरांचा स्पष्ट विरोध आहे. मात्र हा प्रकल्प रेटला जात आहे तो फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रक्टरांचे लाड करण्यासाठी, असे वाभाडे त्यांनी काढले.

आधी भाजपच्या आमदारांनी या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. पण नंतर ते गप्प झाले. त्यांचा आवाज मवाळ का झाला हे मुख्यमंत्री फडणवीसांना विचारा. ते इन्फ्रास्ट्रक्चर मॅन नाहीत तर इन्फ्राप्रॅक्चर मॅन आहेत.