गणेशभक्तांचा परतीचा प्रवास एसटीच्या जुन्या गाड्यांतून, कोकणवासीयांची महामंडळावर नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर मुंबईकर व ठाणेकर गणेशभक्तांनी कोकणातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांनी एसटी प्रवासाला पसंती दिली. पण जुन्या गाड्यांमधून प्रवास करावा लागल्याने प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महामंडळाकडून कोकणात नव्या गाड्या सोडल्या जातील, अशी अपेक्षा गणेशभक्तांना होती. मात्र परतीच्या प्रवासात गणेशभक्तांचा अपेक्षाभंग झाला.

गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबई-ठाण्यातून कोकणात हजारो गणेशभक्त गेले होते. एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन ‘लालपरी’ कोकण मार्गावर चालवण्यात येतील, अशी अपेक्षा ग्रुप बुकिंग केलेल्या गणेशभक्तांना होती. मात्र गेल्या दोन दिवसांत परतीचा प्रवास करताना जुन्या बसगाड्या चालवल्या जात असल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यंदा एसटीच्या तब्बल 5743 गाड्या प्रवाशांनी आरक्षित केल्या. प्रवाशांचा हा मोठा प्रतिसाद लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नव्या गाड्यांचे नियोजन करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. गौरी-गणपती सणासाठी गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाच्या माध्यमातून दरवर्षी ग्रुप गाड्यांचे नियोजन करण्यात येते. यंदाही या प्रवासी संघाने मुंबईहून गावी जाण्यासाठी 800 हून गाड्यांचे ग्रुप बुकिंग केले होते, तर परतीच्या प्रवासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिह्यांतून 600 गाड्या मुंबई, ठाणे आणि पालघरच्या प्रवाशांसाठी आरक्षित केल्या आहेत. एसटीने साडेतेरा टक्क्यांची मोठी कायमस्वरूपी भाडेवाढ करूनही प्रवाशांनी हा मोठा प्रतिसाद दिला. याचा विचार करून एसटी महामंडळाने कोकण ते मुंबई या लांब पल्ल्याच्या मार्गावर शक्य तितक्या अधिक नव्या गाड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी संघाने केली आहे.

बसस्थानकांमध्ये अस्वच्छतेच्या तक्रारी

एसटीच्या प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’ लादला गेला आहे. हा अधिभार वसुलीचा निर्णय जाहीर करताना परिवहन मंत्र्यांनी यापुढे बसगाड्या, बसस्थानकांचा परिसर चकाचक ठेवला जाणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांच्या आवारात ठिकठिकाणी अस्वच्छता दिसून येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.

एसटी महामंडळाने कोकणातील गणेशभक्तांच्या सोयीसाठी पुरेशा गाड्यांची व्यवस्था केली. मात्र परतीच्या प्रवासात जुन्या गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रुप बुकिंग केलेल्या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.  – दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, कोकणवासीय प्रवासी संघ