
पावसाने ओढ दिल्याने यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाची पिके मरणासन्न अवस्थेत पोहोचली आहेत. कर्ज काढून शेतीत पैसा लावला; मात्र पिकेच हातची जाण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांसमोर आता कर्ज फेडण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पिकांची अवस्था पाहून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून सरकारने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.
सप्टेंबर महिन्यातही अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांतील जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. सोयाबीनच्या शेंगा भरण्यावर परिणाम झाला असून, कापसाची वाढही खुंटली आहे. अनेक शेतांमध्ये पिके करपून गेल्याचे चित्र आहे.
कर्ज फेडायचे कसे?
“शेतीसाठी कर्ज काढले, मोठा खर्च केला. आता पाऊसच नाही आणि पिके करपून गेली आहेत. पीकच निघाले नाही तर कर्ज फेडायचे कसे?” असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी आनंद शिंदे यांनी उपस्थित केला.
पिकांवर केलेला खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक चिंता वाढली आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Yavatmal News – पावसाअभावी पीक करपलं, कर्ज फेडायचं कसं? शेतकऱ्याचा टाहो; दुष्काळ जाहीर करून सरसकट मदतीची मागणीhttps://t.co/47blzATFiy pic.twitter.com/00VJ0OEsJM
— Saamana Online (@SaamanaOnline) September 22, 2026
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेऊन सरकारने यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढता भार आणि पुढील हंगामासाठी लागणारा खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

























































