हिंदुस्थानचा विजयोत्सव सुरूच, हरमनप्रीत-दीप्तीच्या शतकामुळे सलग पाचवा विजय; टी-20 पाठोपाठ वन डे मालिकाही खिशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांच्या शतकी झंझावातानंतर हिंदुस्थानने वैष्णवी शर्माच्या फिरकीच्या जोरावर झिम्बाब्वेची फलंदाजी 207 धावांत गुंडाळून आपला विजयोत्सव सुरूच ठेवला. टी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवणाऱया हिंदुस्थानने सलग दुसरी वन डेही जिंकत मालिकाही आपल्या खिशात घातली. आता विजयाचा षटकार खेचण्यासाठी हिंदुस्थानी महिलांचा संघ 28 ऑक्टोबरला शेवटचा सामना खेळेल.

हिंदुस्थानच्या 329 धावांचे आव्हान झिम्बाब्वेच्या फलंदाजांना झेपणार नाही, हे आधीच निश्चित होते आणि तसेच घडले. वैष्णवी शर्मा आणि दीप्ती शर्माने 71 धावा मोजत 7 फलंदाज टिपत पाहुण्यांचा डाव 207 धावांत संपवत 121 धावांचा महाविजय संपादला. झिम्बाब्वेकडून मॉडेस्टर मुपाचिकवा (49), चिपो मुगेरी (46) यांनीच दमदार खेळ केला. वैष्णवीने 39 धावांत 4 तर शतक ठोकणाऱया दीप्तीने 32 धावांत झिम्बाब्वेचे तळाचे 3 फलंदाजही बाद केले. शतकवीर हरमनप्रीत कौर विजयाची शिल्पकार ठरली.

त्याआधी कोटांबी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून ‘टीम इंडिया’ने प्रथम फलंदाजी करणाऱया हिंदुस्थानला स्मृती मानधना आणि शफाली वर्माच्या रूपाने 2 धक्के बसले. 2 बाद 19 या धक्क्याने हिंदुस्थानी डाव अडचणीत आला. त्यानंतर प्रतीका रावल आणि हरमनप्रीत यांनी डावाला आकार दिला. प्रतीकाने 67 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 61 धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने धावांचा वेग वाढवला आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

अखेरच्या दहा षटकांत धाकांचा पाऊस

हिंदुस्थानने अखेरच्या दहा षटकांत 72 धावा जोडल्या. मात्र, या काळात दोन गडी गमावले. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर ऋचा घोषला फार काळ टिकता आले नाही. तिने नऊ चेंडूंत सात धावा केल्या. सुरुवातीच्या पडझडीनंतर हरमनप्रीत आणि दीप्तीने हिंदुस्थानी डाकाला दिलेली झळाळी निर्णायक ठरली. दोघींच्या शतकांच्या जोरावर हिंदुस्थानने झिम्बाब्वेसमोर 329 धावांचे आव्हान उभे केले.

हरमनप्रीतचा शतकी धमाका!

हरमनप्रीतने 121 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने 126 धावांची खेळी केली. हे तिच्या वन डे कारकिर्दीतील आठवे शतक ठरले. तिचे तीन झेल सुटल्याचा फायदा तिने पुरेपूर उठवला. 46.2 षटकांत हरमनप्रीत बाद झाली, तेव्हा भारताच्या खात्यात 301 धावा जमा झाल्या होत्या.