
प्रा. आशुतोष पाटील
एखाद्या राजाच्या काळातील प्रशासन समजून घेण्यासाठी छोटय़ा वाटणाऱया नोंदी अधिक बोलक्या ठरतात. हडकोळणचा शिलालेख याचे उत्तम उदाहरण आहे. नुकतीच गोव्याच्या राज्य पुरातत्त्व संग्रहालयाला भेट दिली असता हा शिलालेख प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. सतराव्या शतकातील मराठी भाषेत कोरलेला हा शिलालेख पाहताना इतिहासाच्या अशा अस्सल साधनांचे महत्त्व पुन्हा एकदा जाणवले.
छत्रपती संभाजी महाराज म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर एक पराक्रमी, धाडसी आणि शत्रूशी अखेरपर्यंत संघर्ष करणारा राजा उभा राहतो. मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध त्यांनी दिलेला लढा हा त्यांच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व केवळ युद्ध आणि पराक्रमापुरते मर्यादित नव्हते. ते उत्तम प्रशासक, साहित्याचे जाणकार आणि आपल्या प्रजेच्या प्रश्नांकडे लक्ष देणारे राज्यकर्तेही होते. त्यांच्या कारकिर्दीतील काही ऐतिहासिक कागदपत्रे, सनदा आणि शिलालेख याची साक्ष देतात. असाच एक महत्त्वाचा शिलालेख गोव्यातील हडकोळण येथे आढळला असून तो सध्या गोव्याच्या राज्य पुरातत्त्व संग्रहालयात जतन करण्यात आला आहे. नुकतीच या संग्रहालयाला भेट दिली असता हा शिलालेख प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या शिलालेखात ‘आता हे हिंदूराज्य जाहाले’ असा उल्लेख आहे.
गोव्याचा इतिहास म्हटला की सर्वप्रथम पोर्तुगीजांची आठवण होते. परंतु गोव्याचा इतिहास केवळ पोर्तुगीजांच्या राजवटीपुरता मर्यादित नाही. कदंब, विजय नगर, बहमनी, आदिलशाही आणि मराठे अशा विविध राजसत्तांनी गोव्याच्या इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे. आजही गोव्यातील किल्ले, मंदिरे, मशिदी, चर्च, शिलालेख आणि इतर ऐतिहासिक अवशेष या इतिहासाची साक्ष देतात. विशेषत फोंडा, डिचोली आणि सत्तरीचा परिसर मराठ्याच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत या भागात अनेक महत्त्वपूर्ण राजकीय आणि लष्करी घडामोडी घडल्या. इ.स. 1683 हे वर्ष गोव्याच्या इतिहासात विशेष महत्त्वाचे ठरले. या काळात मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील संघर्षाने तीव्र स्वरूप धारण केले होते. ऑक्टोबर 1683 मध्ये पोर्तुगीजांनी फोंडय़ाच्या किल्ल्यावर आक्रमण केले. किल्ल्यातील मराठा सैन्याने त्यांचा प्रतिकार केला. नोव्हेंबर महिन्यात स्वत छत्रपती संभाजी महाराज सैन्यासह फोंडय़ाच्या मदतीला पोहोचले. पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागली आणि पुढे दुर्भाट येथेही संघर्ष झाला. याच काळात मुघलांच्या हालचालींमुळे गोव्यातील राजकीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली होती.
या पार्श्वभूमीवर गोव्यातील हडकोळणचा शिलालेख अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. हा शिलालेख फोंडा परिसरातील हडकोळण येथील असून त्यावर शालिवाहन शके 1610, विभवनाम संवत्सर, चैत्र शुद्ध प्रतिपदा अशी तारीख दिलेली आहे. म्हणजेच इ.स. 1688मधील गुढीपाडव्याच्या दिवशीची ही नोंद आहे. हा शिलालेख मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत कोरलेला आहे. उपलब्ध वर्णनानुसार या शिळेची उंची सुमारे 36 इंच आणि रुंदी 10 ते 12 इंच आहे. शिलालेखाच्या वरच्या भागात सूर्य, चंद्र आणि अष्टदल कमळ यांसारखी चिन्हे कोरलेली आहेत. खालच्या भागात गोप्रतिमा आणि ‘शुभं भवतु’ असा उल्लेख असल्याचेही वर्णन आढळते. या शिलालेखाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपती’ असा करण्यात आला आहे. या शिलालेखातील मजकूर वाचताना एक वेगळीच गोष्ट समोर येते. एका स्थानिक व्यक्तीने प्रशासनाकडे केलेल्या विनंतीची आणि त्यावर झालेल्या निर्णयाची नोंद यात आहे. सतराव्या शतकातील गोव्यात नद्या आणि जलमार्ग यांना विशेष महत्त्व होते. मालाची वाहतूक आणि व्यापार यासाठी नद्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत असे. नदी ओलांडण्यासाठी किंवा विशिष्ट जलमार्गांवरून वाहतूक करण्यासाठी आकारल्या जाणाऱया शुल्काचा उल्लेख ‘अंगभाडे’ असा करण्यात आला आहे. हा कर आकारल्यामुळे स्थानिक व्यापारी आणि प्रवाशांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. साम नायकाने याच प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
त्याने आपल्या विनंतीत सांगितले की, पूर्वी आदिलशाहीच्या काळात या भागातील लोकांकडून अंगभाडे घेतले जात नव्हते. त्यामुळे लोकांची ये-जा आणि व्यापारी व्यवहार सुरळीत चालत असत. व्यापार वाढल्यामुळे राज्याच्या उत्पन्नातही भर पडत असे. परंतु मराठय़ांची सत्ता आल्यानंतर अंगभाडे आकारण्यास सुरुवात झाली. परिणामी व्यापारी व्यवहारांवर परिणाम झाला आणि राज्याच्या महसुलालाही धक्का बसला. याच संदर्भात शिलालेखात ‘आता हे हिंदूराज्य जाहालेपासोन आंगभाडें घेउं लागले’ असे म्हटले आहे.
येथे ‘हिंदूराज्य’ हा शब्द विशेष लक्ष वेधून घेतो. पूर्वीच्या आदिलशाही सत्तेचा उल्लेख ‘मुसलमानांचे राज्य’ असा करून मराठय़ांच्या सत्तेला ‘हिंदूराज्य’ असे संबोधण्यात आले आहे. यावरून तत्कालीन स्थानिक समाजातील राजसत्तेविषयीच्या संकल्पना आणि राजकीय ओळख यांची कल्पना येते. मात्र या शब्दांचा अर्थ लावताना शिलालेखाचा संपूर्ण संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे. इतिहासाच्या अभ्यासात एखादे वाक्य स्वतंत्रपणे न पाहता त्याच्या आधीचा आणि नंतरचा मजकूर समजून घेणे किती महत्त्वाचे असते, याचे हे चांगले उदाहरण आहे. या शिलालेखात अर्ध्या कोसासाठी चौदा दुडू आकारले जात असल्याची नोंद आहे. ‘दुडू’ हे तत्कालीन चलनातील एक एकक होते. त्यामुळे हा शिलालेख तत्कालीन गोव्याच्या चलनव्यवस्थेच्या अभ्यासासाठीही उपयुक्त आहे. विशेष म्हणजे ही करमाफी पुढेही कायम ठेवावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या गोव्यातील कारकिर्दीचा विचार करताना आणखी एका महत्त्वाच्या दस्तऐवजाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. तो म्हणजे फोंडय़ाच्या किल्ल्यातील पीर अब्दुल्ला खानाच्या दर्ग्यास दिलेली सनद. इ.स. 1683मध्ये पोर्तुगीजांनी फोंडय़ाच्या किल्ल्याला वेढा घातला होता. या संकट काळात किल्ल्यातील मराठा अधिकाऱयांनी पीर अब्दुल्ला खानाच्या दर्ग्यात नवस केल्याची नोंद पुढील सनदेत आढळते. पोर्तुगीजांचा पराभव झाल्यानंतर हा नवस पूर्ण करण्यासाठी दर्ग्याच्या व्यवस्थेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली.
4 जानेवारी 1684 रोजी कवी कलश यांच्या माध्यमातून दिलेल्या सनदेत या घटनेचा उल्लेख आहे. सनदेत ‘रा. स्वामींचे कोट मजकुरी आगमन होऊन फिरंगी गनिम मारून काहडले. रा. स्वामींची जये झाली. फत्ते जाहली’ असे म्हटले आहे. त्यानंतर पीराच्या दर्ग्यातील दिवाबत्ती, उरूस आणि मुजावराच्या खर्चासाठी वार्षिक तरतूद करण्यात आल्याचे नमूद आहे. या सनदेचे छायाचित्र डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या पोर्तुगीज-मराठे संबंध या ग्रंथात प्रकाशित झालेले असल्याचा संदर्भ मिळतो.
हा दस्तऐवज आणि हडकोळणचा शिलालेख एकत्रितपणे अभ्यासण्यासारखे आहेत. एका ठिकाणी मराठय़ांच्या सत्तेला ‘हिंदूराज्य’ असे संबोधले आहे, तर दुसरीकडे त्याच राजसत्तेकडून मुस्लिम धार्मिक स्थळाच्या देखभालीसाठी आर्थिक तरतूद केल्याचे दिसते. या दोन्ही नोंदी तत्कालीन राज्यकारभाराचे स्वरूप समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. राजसत्तेची धार्मिक ओळख, स्थानिक समाजाच्या धार्मिक परंपरा आणि प्रत्यक्ष प्रशासनातील निर्णय यांचा परस्परसंबंध किती गुंतागुंतीचा होता, याची कल्पना या साधनांमधून येते.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)




























































