कर्मचारी संघटनेच्या धमकीला कंटाळून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याची घटना पाटोदा येथे घडली. गजेंद्र गुंडाले-रेड्डी असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवून गुंडाले यांनी मृत्यूला कवटाळले. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पाटोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी उबाळे हे करत आहेत.
काय आहे प्रकरण?
गजेंद्र गुंडाले हे जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पाटोदा येथील पंचायत समितीमध्ये समावेशित शिक्षण विभागाचे साधन व्यक्ती म्हणून कार्यरत होते. चार वर्षांपूर्वी कर्मचारी संघटनेने शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून नोकरीत परमनंट करण्यासाठी 3100 कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 90 हजार रुपये हवालामार्फत घेतले होते. मात्र चार वर्ष झाली तरी संघटनेने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम केले नाही.
नुकतेच मुख्यमंत्र्यांनी समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या कर्मचारी संघटना पुन्हा जागृत झाल्या. संघटनेने पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. तसेच जे पैसे देणार नाहीत त्यांचे काम होऊ देणार नाही अशी धमकीही एका बैठकीत दिली.
या बैठकीनंतर गुंडाले यांनी आई आणि पत्नीला सर्व प्रकार सांगितला. मात्र त्यांनी सपोर्ट केला नाही. यामुळे गुंडाले यांना मानसिक ताण आला. यानंतर त्यांनी व्हॉट्स अप स्टेटस ठेवून थेट सौताडा धबधबा गाठला आणि जीवन संपवले.
दोन दिवसांपासून गुंडाले बेपत्ता होते. त्यांचा सर्वत्र शोध सुरु होता. गुरुवारी दिवसभर इतर कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांनी सौताडा परिसरातील धबधब्याजवळ सर्वत्र शोधाशोध केली. गुंडाले यांची दुचाकी धबधब्याजवळ आढळून आली, मात्र ते कुठेही आढळून आले नाही. यानंतर शनिवारी सकाळी श्रीराम मंदिरासमोर डोहामध्ये गुंडाले यांचा मृतदेह सापडला.