जगाला आणखी संकटांचा सामना करायचा आहे….नोस्त्रदेमसवरील डॉक्युमेंट्रीतील भाकीत…

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. तसेच या महामारीमुळे जग मोठ्या संकटाचा सामना करत आहे. मात्र, आगामी काळात जगाला आणखी काही संकटांचा सामना करावा लागणार आहे, असे भाकीत फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ते नोस्त्रदेमस यांच्यावर आधारीत बनवण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीत करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या संकटात अनेकांनी जगाच्या अंताबाबतच्या भविष्यवाणी आणि त्यावरील भाकीतांची चर्चा करण्यास सुरुवात केली. फ्रान्सचे प्रसिद्ध भविष्यवेत्ते नोस्त्रदेमस यांच्यावर आधारीत डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे. त्यात नोस्त्रदेमस यांच्या पृथ्वीच्या अंतासह अनेक भाकीतांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यामुळे या डॉक्युमेंट्रीची चर्चा आहे.

नोस्त्रदेमस यांचा 1566 मध्ये मृत्यू झाला. मात्र, त्यांनी मृत्यूपूर्वी केलेली अनेक भाकीते तंतोतंत खरी ठरली आहेत. त्यामुळे अनेकांच्या त्यांच्या भाकीतांवर विश्वास आहे. आगामी काळात जगाला सामना करावी लागणारी संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत नोस्त्रदेमस यांनी केलेल्या भाकीतांवर डॉक्युमेंट्रीत प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. आगामी काळात जगावर अनेक संकटे येण्याची शक्यता आहे. तसेच प्रचंड नरसंहार करणाऱ्या खलनायकाचाही उदय होणार असल्याच्या भाकीताचा या डॉक्युमेंट्रीत समावेश आहे.

अमेरिकेतील यलोस्टोन पार्कमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकाने हाहाकार माजण्याची शक्यता भूगर्भतज्ज्ञ वर्तवत आहेत. नोस्त्रदेमस यांनीही याबाबत भाकीत केले आहे. यलोस्टोनमधील तापमान 45 अंशापर्यंत पोहचेल, त्यावेळी ज्वालामुखीचा उद्रेक होईल, असे भाकीत नोस्त्रदेमस यांनी केले होते. आता गेल्या काही वर्षापासून या भागात 45 अंश तापमान असल्याचे नोस्त्रदेमस यांच्या भाकीतांवर सुमारे 10 वर्षे संशोधन करणाऱ्या इंग्लंडच्या बॉबी यांनी सांगितले.

येशूच्या संदेशाप्रमाणे न वागणाऱ्यांना अँटी क्राइस्ट म्हणण्यात येते. मात्र, आपल्या कार्याकाळात प्रचंड नरसंहार करणाऱ्यांना नोस्त्रदेमस यांनी अँटी क्राईस्ट म्हटले आहे. हिटलरचा अँटी क्राईस्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. असाच प्रचंड नरसंहार करणारा खलनायक अँटी क्राईस्ट येत्या एक दोन दशकात उदयाला येईल, असे बॉबी यांनी सांगितले. नोस्त्रदेमस यांच्या भाकीतावरून हा अंदाज वर्तवत असल्याचे ते म्हणाले. नोस्त्रदेमस यांचे किंग हेनरी द्वितीय आणि हिटलरबाबतचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.

पहिल्या दोन महायुद्धांपेक्षा तिसरे महायुद्ध अधिक भयानक असेल असे भाकीतही नोस्त्रदेमस यांनी केले आहे. या शकताच्या सुरुवातीच्या काळातील काही वर्षात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे महायुद्ध 25 ते 30 वर्षे चालेल, त्यात प्रचंड नरसंहार होईल, असे बॉबी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नोस्त्रदेमस यांनी काही सकारात्मक भविष्यवाणीही केल्या आहेत. तिसरे महायुद्ध संपल्यानंतर जगात एक हजार वर्षे शांतता नांदेल, असे भाकीतही त्यांनी केले आहे. नोस्त्रदेमस यांनी सुमारे 3793 वर्षांपर्यंतच्या भविष्यवाणी केल्या आहेत. त्यामुळे पृथ्वीचा अंतांला अजून बरीच वर्षे असल्याचेही बॉबी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या