मैत्रीमध्ये आपल्या मित्रासाठी अनेकदा लोक आपला जीव ओवाळून टाकतात. संकटामध्ये साथ देतात. मात्र बिहारमध्ये अगदी या उलट प्रकार घडला आहे. एका तरुणाने शुल्लक कारणावरून मित्राचा जीव घेतला आहे. या हत्येमागील कारण धक्कादायक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर प्रकरण गोपालगंज जिल्ह्यातील नगर पोलीस ठाणे परिसरातील आहे. रविवारी दि. 4 ऑगस्ट रोजी ऑफिसर कॉलनीजवळ सावन कुमार उर्फ अश्विनी कुमार सोनी या युवकाची चाकुने वार करून हत्या करण्यात आली. सोमवारी त्याचा मृतदेह रक्त्याच्या थारोळ्यात पडलेला आढळला.
गोपालगंज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजल त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन कुमार रविवारी रात्री त्याच्या मित्र कृतिमानकडे गेला होता. कुरकुरे विकत घेण्यासाठी कृतिमानने सावनला वीस रूपये दिले होते. मात्र सावनने वाटेत कुरकुरे खाऊन टाकले. सावन कृतिमानच्या घरी पोहचल्यानंतर कुरकुरे संपवल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी इतर मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. काही वेळाने सावन त्याच्या घरी जाण्यास निघाला. कृतीमानने सावनला पुन्हा कॉलनीत बोलावून घेतले, आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये सावनचा जागीच मृत्यू झाला.
कृतिमान आणि सावन या दोघांमध्ये लहानपणापासून घट्ट मैत्री असल्याची माहिती त्यांच्या आप्तस्वकियांनी दिली. मात्र पाच रूपयाचे कुरकुरे मैत्री संपवण्यास कारणीभूत ठरले. हत्येनंतर सावनच्या कुटुंबीयांनी कृतिमान कुमारची तक्रार दाखल केला. पुढील 24 तासांतच पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत, आरोपी कृतिमानला अटक करण्यात आली आहे.