
रानडुकराची शिकार करण्यासाठी शिकार्याने लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला होता. अडकलेला बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने त्याला भुलेचे इंजेक्शन दिले. त्याचवेळी बिबट्याने कर्मचार्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने ते बचावले आहेत. बिबिट्याला भूलीचे पूर्ण इंजेक्शन देता आले नाही. त्यामुळे त्याने पोबरा केला असून वन विभागाकडून शोध मोहीम सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
जालना जिल्हृयातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील शेतकरी शरद घाडगे गट 172 मध्ये शिकार्याने रात्रीच्या वेळी रानडुकरे पकडण्यासाठी अनेक ठिकाणी सापळे लावले होते. मोसंबी शेतात झाडाजवळ रानडुकारासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र, त्यात रानडुक्कराऐवजी जाळ्यात बिबट्याच अडकला. नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता सालगडी केरुभान हंगारगे बैलगाडी घेऊन शेतात जात असताना बिबट्या शिकणार्याच्या पिंजर्यात अडकल्याने बैलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा पाय पिंजर्यात अडकल्याने त्याला बैलावर झडप घालता आली नाही. बिबटया सपाळ्यात अडकल्याचे समजताच शेतकरी शेतातील काम सोडून पळाले.
जालना जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांना घटनेची माहिती मिळताच अभय अटकळ व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संभाजीनगर येथील शिघ्र कृती दल, वनविभागाचे कर्मचारी, वनजिव्य अभ्यासक, अदी गुंठे, धनपाल घटनास्थळी पिंजरे, जाळे, भुल देण्यासाठी सर्व साहित्य आणले. त्यांनी भूल देत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
भुलीचे इंजेक्शन देताच बिबट्याने अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उड्या मारल्याने ते बचावले.त्याला भूलीचे इंजेक्शन पुर्ण क्षमतेने देता आले नाही. त्यामुळे जखमी अवस्थेतच त्याने पळ काढला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
बिबट्या जास्त दुर पळू शकत नाही
बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने जास्त दूर पळून जाऊ शकत नाही. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, असे जालना वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांनी सांगितले.





























































