
नवीन अंशदायी योजना रद्द करून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील 12 लाख सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक तास ठिय्या आंदोलन पुकारले होते.
नवीन अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही. ही योजना सुरू झाल्यापासून मागील 16 वर्षांत मत्युमुखी पडलेल्या 1 हजार 622 कर्मचाऱ्यांच्या वारसांना अतिशय तुटपुंजी रक्कम मिळाल्याने कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, असा आरोप बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे ही योजना रद्द करण्याची प्रमुख मागणी असल्याचे संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड म्हणाले. या आंदोलनात राज्यातल्या 36 जिह्यांतील सर्व शासकीय कर्मचारी व मंत्रालयीने कर्मचाऱ्यांनी भाग घेतला असा दावा संघटनेने केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून त्याची शिफारस केंद्र सरकारला करावी अशी सूचना अविनाश दौंड यांनी केली.




























































