गप्पा टप्पा… अगदी सहज! चार मित्रांनी सुरू केला अनोखा बॅण्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याकडे प्रयोगशील मंडळींची कमी नाही. त्यातूनच नवनवीन संकल्पना जन्माला आल्या आहेत. आपला कार्यक्रम वेगळा कसा ठरेल आणि त्यातून प्रत्येक कलाकाराची वेगळी ओळख कशी निर्माण होईल, या उद्देशाने चार मित्रांनी एकत्र येऊन ‘गप्पा-टप्पा’ हा अनोखा स्टेज शो सहा वर्षांपूर्वी सुरू केला. अवघ्या काही वर्षांत ‘गप्पा-टप्पा’ ने रसिकांच्या मनाचा कप्पा व्यापला आहे. कोणत्याही स्क्रीप्टशिवाय, अगदी उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांना सहभागी करत, गाणी-कवितांचा आविष्कार घडवत हा कार्यक्रम रंगत जातो.

2015 साली गप्पा-टप्पा कार्यक्रमाला सुरुवात झाली. कवी, गीतकार अंबरीश देशपांडे, संगीतकार आदित्य बर्वे, संगीतकार-गायक केदार फडके आणि कवी-गायक प्रतीक कानडे या चौघांनी मिळून  कार्यक्रम सुरू केला. आता त्यांच्यामध्ये कवी, गीतकार मंदार चोळकर सहभागी झाले आहेत. ‘गप्पा-टप्पा’हा दिलखुलास कविता आणि सुश्राव्य गाणी ठासून भरलेला कार्यक्रम आहे. लहानपणीच्या आठवणीपासून सुरुवात करून देव, कलाकार, प्रेम असे अनेक विषय कार्यक्रमातून सहज स्पर्शून जातात. बांधील सूत्रसंचालन न करता, थेट प्रेक्षकांशी गप्पा करत, त्यांनाच प्रश्न विचारत कार्यक्रम समोर नेण्याची शैली आणि स्टेजवरून मनमोकळया चर्चा करत आपली कला सादर करणारे हे कलाकार प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण अनुभूती देत जातात.

अगदी सोप्या, पण मनाला भिडणाऱया कविता आणि लगेच लक्षात राहणारी, सहज गुणगुणता येतील अशी गाणी असणारा हा अनोखा प्रयोग राज्यभरातील रसिकांच्या पसंतीला उतरला आहे.  पुणे, गोवा, मुंबई, ठाणे, कणकवली, महाड अशा अनेक ठिकाणी रसिकांचे प्रेम मिळाले आहे. आतापर्यंत ‘गप्पा-टप्पा’ चे 36 प्रयोग झाले आहेत.

कॅम्पिंग शोचा प्रयोग

तब्बल दोन वर्षांनंतर लाइव्ह शोज सुरू झाले आहेत आणि ‘गप्पा-टप्पा’ हा मराठी गाण्याचा कार्यक्रम कोविडनंतर परत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 25 डिसेंबरला लोणावळा येथे बगीचा नाइट कॅम्पिंग (पावना लेक) येथे कॅम्पिंग शो आयोजित करण्यात आला आहे. रात्रीच्या मंद प्रकाशात, शेकोटीच्या बाजूला निवांत बसून रंगतदार कविता आणि ओरिजनल नव्या धाटणीची सुश्राव्य गाणी असा एकत्रित आनंद प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  कॅम्पिंगच्या ठिकाणी अशा पद्धतीचा मराठी शो करणारा   गप्पा-टप्पा हा पहिला बॅण्ड आहे.

दोन तासांची पर्वणी

दोन तासांच्या गप्पा-टप्पा कार्यक्रमात रसिकांना ओरिजनल गाणी आणि कवितांचा आनंद घेता येईल. शास्त्राrय संगीत ते ब्लूज जॉनरचे गाणे, लहानपणाच्या आठवणी ते आयुष्यभराचे अनुभव देणाऱया गप्पांची पर्वणी मिळते, असे आदित्य बर्वे यांनी सांगितले. साजणी तू, शहाळ्याच्या पाण्यापरी, तसेच एक कप कॉफी, पैंजण वेड लावती  आदी गाणी तसेच अमरीश देशपांडे याची स्कूटीवाली लडकी, खिडकी, मर्सिडिज, मंदार चोळकरची फेअर ऍण्ड लव्हली, पावसाच्या पल्याड अशा कविता वेड लावतील, असे आदित्य बर्वे यांनी सांगितले.