
हिवाळी अधिवेशनात सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. “ते शिवसेनेचे नाहीत, तर गद्दार टोळीचे आमदार आहेत. शिवसेना एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेतृत्वाखालील अधिकृत खात्यावरूनच तो व्हिडिओ ट्वीट झाला आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओवरही निशाणा साधत तो “भयानक आणि दिशाभूल करणारा” असल्याचा आरोप केला. प्रचाराच्या नावाखाली हेलिकॉप्टरमध्ये दोन मोठ्या बॅगा घेऊन जाण्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “या बॅगांमधून नक्की काय वाटप होत होतं याचे फुटेज टेलिव्हिजनवर दाखवले गेले आहे.” त्यांनी पुढे भाजपला उद्देशून विचारले की, “जो पक्ष स्वतःला ‘न खाता हू, ना खाने देताहूं’ म्हणतो, तो याच लोकांना संरक्षण का देतो? त्यांच्यावर कारवाई का होत नाही?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इतकं बहुमत असूनही सरकारला विरोधी पक्षनेत्याची भीती का वाटते? महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात लोकशाही चालवताना विरोधी पक्ष दुर्लक्षित करणे ही भीती आणि असुरक्षिततेची लक्षणे आहेत,” अशी टीका त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होऊ नये म्हणून काही गट मुद्दाम अफवा पसरवत असल्याचाही आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, प्रलंबित कारवाई आणि बिनदिक्कत सुरू असलेल्या व्यवहारांवरही प्रश्न विचारत ठाकरे म्हणाले की, “अनेक प्रकारांची चौकशी अपूर्ण आहे, परंतु सरकारकडून कोणतीही ठोस पावले दिसत नाहीत.”





























































