
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे गिरगाव आणि वरळी येथील तसेच माता रमाबाई यांचे वरळी येथील प्रस्तावित स्मारक प्रेरणादायी व्हावे, असे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. याचबरोबर काळा घोडा परिसरातील पादचारी रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याची सूचनाही त्यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे यासंबंधीच्या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. आदित्य ठाकरे म्हणाले, दोन्ही स्मारकांना भेट देणाऱया भाविकांना येथे आल्यावर प्रसन्न वाटेल आणि या महान व्यक्तिमत्वांच्या कार्याची माहिती मिळेल तसेच ही उत्कृष्ट स्मृतिस्थळे ठरतील असे आकर्षक डिझाईन तयार करून घ्यावे. शाहू महाराजांच्या गिरगावमधील स्मारकाजवळ क्यूआर कोडद्वारे त्यांच्या कार्याची माहिती देता येईल का याचाही प्रयत्न करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार, वाहतूक विभागाचे अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी, पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे आदी उपस्थित होते.


























































